जेष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांना ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार जाहीर : माजी आमदार ॲड.श्रीपतराव शिंदे यांच्या स्मृतिदिनी पुरस्काराचे वितरण
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जेष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांना ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार जाहीर : माजी आमदार ॲड.श्रीपतराव शिंदे यांच्या स्मृतिदिनी पुरस्काराचे वितरण
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गडहिंग्लज
येथील दिनकरराव के. शिंदे स्मारक ट्रस्टचा सन २०२४ सालाचा ‘दिनकर मास्तर पुरस्कार’ जेष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण सोमवार दि.१४ ऑक्टोबर रोजी स.१० वाजता भडगाव येथील श्रीपतराव शिंदे शैक्षणिक संकुलात होणार आहे अशी माहिती संस्थेच्या सचिव प्रा.सौ.स्वाती कोरी यांनी दिली.
माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांचा पहिला स्मृतिदिन दिनकरराव के. शिंदे स्मारक ट्रस्टतर्फे ‘दिनकर मास्तर’ पुरस्कार वितरण सोहळा खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
राजन गवस यांचा जन्म अत्याळ (ता.गडहिंग्लज) या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या ‘तणकट’ या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांची ‘चौंडकं’ ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. ‘लोकसत्ता’च्या शनिवारच्या ‘चतुरंग’ या पुरवणीत ‘सुत्तडगुत्तड’ या सदरात ते लेखन करीत असत.
राजन गवस यांनी भाऊ पाध्ये यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी. मिळवली. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे काम केले. कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.
महाविद्यालयीन काळातच कविता, कथा लिहिणारे राजन गवस यांची ‘दैनिक पुढारी’ मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये ‘उचकी’ ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी ‘हुंदका’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरी लेखनाचा झाला. ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’, ‘ कळप’ या कादंबऱ्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्र ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. त्यांनी लिहिलेल्या ‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि ‘रिवणावायली मुंगी’ या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत.
डॉ. राजन गवस यांना श्री.दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते ‘दिनकर मास्तर पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी ‘शोषितांचा आधारवड : तुमचे आमचे श्रीपतराव’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी व्ही. बी. पाटील, संस्थाध्यक्षा ऊर्मिला शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space