पाल येथील रोजगार मेळाव्यात ५९८ युवक-युवतींच्या मिळाला रोजगार; ३६ नामांकित कंपन्यांकडून तीन हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
पाल येथील रोजगार मेळाव्यात ५९८ युवक-युवतींच्या मिळाला रोजगार; ३६ नामांकित कंपन्यांकडून तीन हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि श्री. आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय, पाल (ता. भुदरगड) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात तब्बल १,०५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून ५९८ युवक-युवतींना रोजगाराची संधी मिळाली.
पाल येथील श्री. आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक तथा युवा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील ३६ नामांकित खासगी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. कंपन्यांकडून तीन हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. किमान दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
यामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या. रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हा मेळावा नोकरीची दारे उघडणारा महत्त्वाचा उपक्रम ठरला.
केवळ नोकरीच नव्हे, तर स्वयंरोजगाराच्या संधींचाही मार्ग या मेळाव्यातून युवकांसाठी खुला करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह विविध आर्थिक विकास महामंडळांच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच महाविद्यालयाच्या माध्यमातून केवळ एका मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सातत्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. जमीर करीम यांनी रोजगार मेळाव्याचे महत्त्व आणि त्यातून युवकांना उपलब्ध होणाऱ्या संधींची माहिती दिली. जिल्हा रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष श्री. संजय पेंडसे यांनी मनोगत व्यक्त केले.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी वाय बी पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार, सभापती श्री. विक्रमसिंह पाटील, माजी सभापती बाबा नांदेकर, कल्याणराव निकम, उपसभापती सौ. अरुणा प्रशांतसिंह देसाई, शरद सूतगिरणीचे व्हा. चेअरमन अशोक फराकटे, पंचायत समिती सदस्य सुनील किरोळकर, धनंजय मधुकर लाड, सौ. कल्याणी युवराज फगरे, एकनाथ जाधव, शिवाजी ढेंगे, अजित देसाई, के. एल.पाटील, सौ. मंगल कांबळे यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रमुख, उद्योजक, शासकीय महामंडळांचे व्यवस्थापक, महाविद्यालयीन कर्मचारी, युवक-युवती, पालक तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वी नियोजनासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश पाटील, कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपाली गोसावी, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नीरज जाधव,पॉलिटेक्निकच्या हेड कविता कुरळे, कडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी, इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य तुकाराम माने आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौरभ पाटील व सौ. स्मिता मोहोळकर यांनी केले, तर आभार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश पाटील यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





