वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ ऑक्टोबरला आकाशवाणीवर जीवन साळोखे उलगडणार ग्रंथदान उपक्रमाचा प्रवास
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ ऑक्टोबरला आकाशवाणीवर जीवन साळोखे उलगडणार ग्रंथदान उपक्रमाचा प्रवास

साडेतीनशेहून अधिक शाळा, महाविद्यालये व वाचनालयांना हजारो पुस्तकांचे ग्रंथदान
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
वाचन संस्कृतीचा प्रसार, वाचनाचे संस्कार आणि ग्रंथव्यवहाराला चालना देण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून सातत्याने ग्रंथदान उपक्रम राबविणारे ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांच्या कार्याचा प्रवास आता आकाशवाणीवरून उलगडणार आहे. राष्ट्रीय वाचन प्रेरणा दिनानिमित्त गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून त्यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या पसंतीच्या ‘इंद्रधनू’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही निर्मिती असून, प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या बेहरे यांनी जीवन साळोखे यांच्याशी संवाद साधला आहे. अर्ध्या तासाच्या या मुलाखतीत साळोखे आपल्या दोन दशकांच्या ग्रंथदान उपक्रमाचा प्रवास, त्यामागील प्रेरणा आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देणार आहेत.
जीवन साळोखे यांनी गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील साडेतीनशेहून अधिक शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक वाचनालयांना हजारो पुस्तके भेट दिली आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही मोठ्या यंत्रणेचा आधार न घेता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. विविध शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन पुस्तकांचे वाटप करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांत वाचन संस्कृतीचा जागर केला आहे. पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार व्हावा, विद्यार्थ्यांना समृद्ध साहित्याची ओळख व्हावी आणि वाचनाची गोडी समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने त्यांचे कार्य सुरू आहे.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रसारित होणारी ही विशेष मुलाखत ग्रंथदान चळवळीला प्रोत्साहन देणारी आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी प्रेरणा देणारी ठरणार आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





