‘पुरोगामी शैक्षणिक पालकत्व ‘ एक स्तुत्य उपक्रम : गटविकास अधिकारी सौ..सोनाली माडकर निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण शुभारंभ
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
‘पुरोगामी शैक्षणिक पालकत्व ‘ एक स्तुत्य उपक्रम : गटविकास अधिकारी सौ..सोनाली माडकर
निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण शुभारंभ

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पन्हाळा
बालपणी वडिलांचे छत्र हरपलेल्या निराधार विद्यार्थ्यांना मायेचा आधार देणारा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचा ‘पुरोगामी शैक्षणिक पालकत्व’ हा सामाजिक उपक्रम स्तुत्य असून याचा आदर्श समाजातील सर्वच घटकांनी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तथा प्रशासक सौ.सोनाली माडकर यांनी केले.
पन्हाळा तालुक्यातील निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण शुभारंभप्रसंगी अध्यक्षस्थानावरून सौ.माडकर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, गटविकास अधिकारी या नात्याने आतापर्यंत अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिले पण हा कार्यक्रम मनाला खूप भावला असून या समोर बसलेल्या चिमुकल्यांना ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना सातत्याने मदत करणे आवश्यक आहे. समाजातील इतर संघटनांनीही या उपक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून असे सामाजिक उपक्रम घ्यावेत असे आवाहन केले.
यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.शिवाजीराव मोरे म्हणाले, आपल्या जिल्हा परिषद शाळेत इतक्या मोठ्या संख्येने निराधार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे या उपक्रमामुळे समजले. पुरोगामी शिक्षक संघटनेने अशा मुलांचा शोध घेऊन प्रत्यक्ष त्या मुलांपर्यंत मदत पोहोचवण्याचे सुरू केलेले कार्य कौतुकास्पद आहे. पुरोगामी शिक्षक परिवाराने आपल्या हक्कासोबत सामाजिक बांधिलकी सातत्याने जपली आहे. ज्या समाजातून आपण पुढे आलो त्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो ही भावना जपण्याचे काम या संघटनेने केले असून हा आदर्श सर्वांनी घेणे आवश्यक आहे.
गटशिक्षणाधिकारी श्री.शिवाजी मानकर म्हणाले, चिमुकल्यांच्या जीवनात इतक्या लहान वयात दुःखाचा डोंगर कोसळलेला पाहून मन हेलावून जाते. पुरोगामी शिक्षक संघटनेने या मुलांसाठी सुरू केलेली मदत या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी नक्की प्रेरणा देईल.
संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.प्रसाद पाटील म्हणाले, पुरोगामी शिक्षक संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त मदत, कोविड सेंटरला मदत, गंभीर आजारी विद्यार्थ्यांना मदत, अनाथालय, वृध्दाश्रम, आश्रमशाळा यांना वेळोवेळी मदत इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी सातत्याने राबवत आली आहे. पुरोगामी शैक्षणिक पालकत्व हा उपक्रम निराधार चिमुकल्यांना आधार देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात असून या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी व त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व प्रशासन इत्यादी सर्व घटकांनी सातत्याने मदत करणे आवश्यक आहे.
या उपक्रमातंर्गत आतापर्यंत २४९० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारण्यात आले असून आपल्या जिल्ह्यातीत वडिलांचे छत्र हरपलेले ४००० पेक्षा जास्त विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. पालकत्व संकलन होईल तसे त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोच केले जाणार आहे.
यावेळी बहिरेवाडी गावच्या लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच सौ.प्रमिला जाधव यांनीही उपक्रमाचे कौतुक करत २० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारण्याचे जाहीर केले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी शैक्षणिक पालकत्व स्विकारणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी श्री.शशिकुमार पाटील, श्री.संजयकुमार काळे, केंद्रप्रमुख श्री.रंगराव बरगे, श्री.कैलास वसावे, शाहुवाडीचे केंद्र प्रमुख श्री.सदाशिव थोरात, संघटनेच्या महिला राज्य सरचिटणीस सौ.शारदा वाडकर, राज्य संघटक पी आर पाटील, जिल्हाध्यक्ष एस के पाटील, जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस अलका थोरात, के एस पाटील, उत्तम घाटगे, पन्हाळा अध्यक्ष बाबा रणसिंग, सरचिटणीस नाथ मोरे, शोभा गायकवाड, सुप्रभा कांबळे, मंगल देवेकर, जीवन माळवी, रणजित सुर्यवंशी, श्रीकांत टिपुगडे आदी पदाधिकारी, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक संघटनेचे मार्गदर्शक के एस पाटील यांनी केले, सुत्रसंचलन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत टिपुगडे यांनी केले तर आभार पन्हाळा अध्यक्ष बाबासो रणसिंग यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





