आपटा, कांचन वृक्षांचे जतन व संवर्धन व्हावे : पर्यावरणमित्र अवधुत पाटील निसर्गाचे संवर्धन हेच खरे सीमोल्लंघन हा संदेश देत आपटा, कांचन वृक्षांचे पुजन
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
आपटा, कांचन वृक्षांचे जतन व संवर्धन व्हावे : पर्यावरणमित्र अवधुत पाटील
निसर्गाचे संवर्धन हेच खरे सीमोल्लंघन हा संदेश देत आपटा, कांचन वृक्षांचे पुजन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
विजयादशमी दसरा सीमोल्लंघनात मोठ्या प्रमाणात आपटा, कांचन ह्या दुर्मिळ झाडांची तोड होऊन आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकास भेट दिली जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असते. खानापूर येथील पर्यावरणमित्र अवधुत पाटील व परिवाराकडून आपटा, कांचन ह्या दुर्मिळ वृक्षांचे जतन व संवर्धन व्हावे ह्या हेतूने प्रत्येक वर्षी झाडांचे पूजन करून वृक्ष जतन व संवर्धनाचा संदेश दिला जातो.
पर्यावरण संतुलन साधायचं झाल्यास निसर्गातील झाड ह्या घटकास अनन्यसाधारण असं महत्व आहे. पर्यावरण संतुलन साखळीत अग्रस्थानी असणाऱ्या वृक्षांचे महत्वपूर्ण स्थान अधोरेखित करताना, त्यांची लहान बाळाप्रमाणे काळजी घेऊन जोपासना करायला हवी. दैवतासमान असणारी ही झाडं अन्न, पाणी, वारा, निवारा, मायेची थंडगार सावली, उन्हाळ्यात हक्काचा विसावा तर देतातच, शिवाय एकवेळ म्हातारपणी मुले आपल्याकडे दुर्लक्ष करतील पण झाडे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ देतील.
वृक्षतोड, वणवे, मानवाचा जंगल संस्कृतीतील वाढता हस्तक्षेप झाडांच्या मुळावर उठत आहे, विजयादशमी दसरा हा सण आपल्या भारत वर्षात सर्वत्र मोठ्या उच्चाहात साजरा होतो, सीमोल्लंघन दिवशी जंगलातून आपट्याच्या झाडाच्या फांद्या गावच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा मोकळ्या पटांगणात रचल्या जातात, सायंकाळी सर्व गावकरी एकत्र येऊन विधीवत पुजा करून, हे सोने (आपट्याची पाने) लुटतात, एकमेकांना नमस्कार करत ही पाने वाटली जातात. परंपरेनुसार ही पाने भेट देताना, मोठ्या प्रमाणात आपट्याच्या झाडांची, पानांची तोड होते.
दसरा ह्या सणाच्या शुभदिनी हजारो झाडांची अक्षरशः कत्तल होते. पाने ओरबडली जातात, त्यामुळे हे असेच सुरू राहीले तर आपटा, कांचन ही झाडे पृथ्वीतलावरून नष्ट व्हायला, नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे सीमोल्लंघन दिवशी आपटा, कांचनची झाडे लावण्याबरोबरच, झाडे भेट देऊयात, पानांच्या बदली एकमेकांना फुले देऊयात, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊयात. पर्यावरण जतन व संवर्धनात झाडांचे महत्व लक्षात घेऊन टाकलेले हे पाऊल मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.
आजच्या आपटा, कांचन वृक्षांचे पूजन ह्या प्रबोधनपर उपक्रमात पर्यावरणमित्र अवधुत पाटील, मयुरी पाटील, मिथाली पाटील, जान्हवी व श्रावणी आदींनी सहभाग घेतला. तालुक्यामध्ये वृक्षारोपण, वृक्ष जतन व संवर्धन चळवळ अधिक गतिमान करण्याचे वचन घेऊन उपक्रमाची सांगता झाली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





