जेष्ठ कादंबरीकार शि.गो.पाटील यांच्याशी नुकत्याच मारलेल्या साहित्य विषयक गप्पा – शब्दांकन : संजय खोचारे
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जेष्ठ कादंबरीकार शि.गो.पाटील यांच्याशी नुकत्याच मारलेल्या साहित्य विषयक गप्पा : आज शि.गो.मामा आमच्यात राहिले नाहीत. त्यांना विनम्र आदरांजली
– शब्दांकन : संजय खोचारे 
कधी लेखक म्हणून वागण्यात तोरा नाही. कुठल्या पुरस्काराची हाव नाही. प्रसिद्धीपासून चारहात दूर राहून लेखनात अख्खा दिवस घालवणाऱ्या जेष्ठ साहित्यिक शि.गो.पाटील यांचा जन्म धामणे (ता.आजरा) येथे १८ मार्च १९३९ रोजी शेतकरी कुटूंबात झाला. वडील गोविंद आणि आई निलव्वा यांच्या पोटी जन्मलेला हा मुलगा शेतकामात आई वडीलांना मदत करत असे. जेमतेम सातवी पर्यंत शिक्षण असूनही या लेखकाने आजअखेर दहा पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.
१९७० ला त्यांची पहिली ‘भिंगरी’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या काळात प्रत्येक शेतकऱ्याकडे डिझेल इंजिन नसे. शि.गो.मामा बैलांना जुंपलेले गाड्यावरील डिझेल इंजिन शिवारात मागणी असेल तेथे घेऊन जात असत.
एकिकडे धूर टाकीत इंजिन सुरु राही. तर लेखक शि.गो.पाटील थंडगार सावलीत बसून कथा, कादंबरी लेखनात रंगून जात. भिंगरी नंतर क्रांतिवीर भाऊ फराळे (चरित्र कादंबरी), तुफान वादळ, खटपट्या, मालकिण, गुणवंताची लेक, गणगोत, पिंपळपार आदी कादंबऱ्या लिहिल्या. खैंदळ ही त्याची कादंबरी लवकरच प्रकाशित होत आहे. झुंज, खत्रूड हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. भिरकुंड हा कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे.
जुन्या काळातील ग.ल.ठोकळ, गो.नी.दांडेकर, श्री.ना.पेंडसे, भाऊ पाध्ये या लेखकांची सर्व पुस्तके त्यांनी झपाटल्यागत वाचून काढली. त्यामुळे वाचनाचे वेड वाढत गेले. शालेय जीवनात त्यांचे मार्गदर्शक शिक्षक धोंडीराम पोवार-हंचनाळ यांनी शामची आई हे साने गुरुजींचे पुस्तक त्यांना उपलब्ध करुन दिले. या पुस्तकाने त्यांना लेखन प्रेरणा मिळाली. गो.नी.दांडेकरांचे पवना काठचा धोंडी या कादंबरीमुळे आपणही असे लेखन करु शकू हा आत्मविश्वास त्यांना मिळाला. र.वा.दिघे यांची सराई ही कादंबरी वाचतांना त्यांना आपल्या परिसरातील तपशील त्या लेखनात असल्याचे जाणवले. शेत, शिवार, मजूरी, गरीबी हे मुद्देही त्यांच्या अवती भवती होतेच. त्या सर्व कृषीजन संस्कृती बद्दल शि.गो.पाटील सविस्तर लिहू लागले.
नव्या पिढीतिल रंगराव बापू पाटील, जेष्ठ लेखक राजन गवस यांच्या कथा,कादंबऱ्या आपण अधीक आत्मियतेने वाचल्याचे ते सांगत. रणजीत देसाई, शिवाजीराव सावंत, शंकर पाटील, आनंद यादव यांच्या काही काळ साहवासात रहाता आल्याबद्दल ते आनंद व्यक्त करायचे. वि.स.खांडेकर यांना भेटायची खूप इच्छा होती. मात्र घरी जाऊनही ते विश्रांती घेत असल्याने मी बोलू शकलो नाही ही खंत त्यांच्या मनात होती. ‘तुझी बायको माझी मेहुणी’ हे लोकनाट्य त्यांनी लिहून पूर्ण केले आहे.
३७ वर्षे सलग धामणे गावचे पोलिस पाटील म्हणून कार्यरत होते. गावच्या विठ्ठल मंदिरातील भजनात ते मृदंग वाजवण्यात रमत. घरच्या पिठाच्या गिरणीतही त्यांनी बरीच वर्षे काम केले होते. दळप दळण चालू असताना आर्धी कथाही ते लिहून काढायचे. वयाच्या ऐंशी नंतरही सलग लेखन सुरु आहे. प्रकाशनाच्या वाटेवर असलेली दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती साठी देण्यात येणारा भूमिपुत्र साहित्य पुरस्कार, पी.बी.पाटील साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता.
आज अखेर कधीही पुरस्कारासाठी लिहीले नाही. सामान्य कष्टकरी शेतमजूर, सालगडी, अल्पभूधारक, क्रांतिकारक, खेडूत महिला जीवन हेच त्यांच्या लेखनाचे गाभा घटक राहिले. यापुढे कोणत्याही मानसन्मानाची किंवा पुरस्काराची ओढ राहिली नसून प्रकृती ठिक राहून सदैव लिहिता यावे हेच विठ्ठलाकडे मागणे मागितल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा अखेरच्या गप्पा ठरल्या हे दुःख आहे. मी सतत त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी घरी जात असे. मी गेल्यावर कित्येकदा त्यांनी मला सोबत बसून भोजनाचा आग्रह केला. विशेषतः उत्तूरच्या बाजारात त्यांची माझी भेट व्हायची. असे हे प्रेमळ, मायाळू स्नेही अचानक गेले. लेखक शि.गो.पाटील यांना विनम्र आदरांजली.
शब्दांकन : संजय खोचारे (७७६७८१५२७७)
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





