संस्काराची विद्यापीठे असलेल्या आई-वडिलांच्या भावनाशी खेळू नका : सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांची युवकांना भावनिक साद
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
संस्काराची विद्यापीठे असलेल्या आई-वडिलांच्या भावनाशी खेळू नका : सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांची युवकांना भावनिक साद
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कूर
आज समाजात नितीमूल्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड सुरु आहे. माहितीला ज्ञान समजण्याची चूक युवकांकडून होत आहे. त्यामुळे समाजात बेबंदशाही माजली आहे. आई-वडील हे संस्कारांची विद्यापीठे असतांना त्यांनी रुजवलेले संस्कार पायदळी तुडविले जात आहेत. जन्म देणारे आई-वडील हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतांना आज समाजात त्यांच्या भाव-भावना आणि इच्छा आकांक्षांचा बळी दिला जात आहे. अशा विदारक परिस्थितीत राष्ट्र व समाजाचे चित्र, चारित्र्य आणि चरित्र घडविण्याची नैतिक जबाबदारी युवकांची आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.
नाधवडे (ता.भुदरगड) येथे कलाकार एकता वेल्फेअर फौडेशन संचलित, अखिल भारतीय कलाकार एकता महासंघ महिला आघाडीच्या वतीने आयोजित ‘आई-बाप समजून घेताना’ या विषयावर श्री.हंकारे बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शासकीय कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष सर्जेराव मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते आनंद हाबळे उपस्थित होते.
श्री.हंकारे पुढे म्हणाले, आज समाजात भौतिक चंगळवाद माजला आहे. ग्रामीण भागातील श्रम संस्कृतीबरोबर येथील नितीमूल्य हरवत चालली आहेत. नात्यातील संवाद संपत चालल्याने माणसांची मने संवेदनाहीन झाली आहेत. याचा अनिष्ठ परिणाम तरुणाईवर दिसुन येत आहे. त्यामुळे आई-वडिलांच्या ह्दयाला वेदना होतील असे वर्तन त्यांच्याकडून सर्वत्र होत आहे. ही बाब समाजाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.
स्वागत व प्रास्ताविक अखिल भारतीय कलाकार एकता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष जयवंतराव वायदंडे यांनी केले. यावेळी कलाकार संघाच्या उपाध्यक्षा अनिता पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभा पाटील, जिल्हाध्यक्ष दिनकर भोसले, संस्थापक संचालक उदयराज पोवार,ऊमेश अवघडे, महेश कदम, सात्तापा पाटील, ज्ञानेश्वर अवघडे, संतोष लोहार, संभाजी भराडे, दिगंबर पाटील, दिपक सुतार, सात्तापा पाटील (नांदोलीकर) तसेच शाहू प्रबोधनी अकँडमी कोनवडे,अभिनव करिअर अकँडमी कोनवडे,नाधवडे हायस्कूल व विद्यामंदिरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन एन.पी.पाटील यांनी तर आभार शोभा पाटील यांनी मानले.
चौकट- *मुलींचे अश्रू*
व्याख्याते वसंत हंकारे यांनी आपल्या पहाडी आवाजात बापाचा ‘धाक’ आणि मनात आईचं ‘वात्सल्य’ जागृत करत जीवनात आई-बापाचं महत्व, त्यांचा त्याग, कष्ठ, समर्पण वृत्ती ओघवत्या भाषेत मांडत मुलींच्या भावनेलाच हात घातला.त्यामुळे व्याख्यान संपेपर्यंत मुलींचे डोळे अश्रूनी डबडबले होते. तर अनेक मुली हमसून-हमसून रडत होत्या.यामुळे व्याख्यानस्थळी एक भावनिक वातावरण तयार झाले होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





