वाचनाअभावी समाजातील वाचकसंस्था लोप पावत आहे : जेष्ठ साहित्यिक जीवनराव साळोखे कोतोलीत ग्रंथदान उपक्रम उत्साहात
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
वाचनाअभावी समाजातील वाचकसंस्था लोप पावत आहे : जेष्ठ साहित्यिक जीवनराव साळोखे
कोतोलीत ग्रंथदान उपक्रम उत्साहात
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोतोली
वाचनाअभावी समाजातील वाचक संस्था झपाट्याने लोप पावत आहे. परिणामी आचार, विचार आणि संस्कार करण्याचे दरवाजे बंद होत चालले आहेत. त्यामुळे सामाजिक मूल्यांची होणारी घसरण चिंताजनक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले. ते पन्हाळा तालुक्यातील १४ माध्यमिक शाळा व ज्युनिअर कॉलेजना आणि दळवेवाडी येथील हमालांच्या वाचनालयास आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ग्रंथभेट कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य प्रफुल्ल पोर्लेकर होते. यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृतीसमितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे सहसचिव अजित रणदिवे, संचालक श्रीकांत पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्राचार्य जीवन साळोखे यांनी शाळांना ३०० पुस्तके भेट दिली.
संपूर्ण जिल्ह्यात सुरू असणाऱ्या आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत, वाचन प्रोत्साहन व समृद्ध शालेय ग्रंथालयासाठी जीवन साळोखे यांनी यावेळी पन्हाळा तालुक्यातील श्री.ज्योतिर्लिंग हायस्कूल,क॥बोरगाव, साधना हायस्कूल, पुनाळ, माध्यमिक विद्यालय,घोटवडे, जय ज्योतिर्लिंग हायस्कूल,कोलोली,स्वामी स्वरूपानंद हायस्कूल,तिरपण, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल आणि योगी प्रभुनाथ हायस्कूल वाघवे, बाबासाहेब पाटील हायस्कूल,आणि नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोतोली, ज्ञानराज हायस्कूल, सावर्डे (कळे), संजयसिंह माध्यमिक विद्यालय,दळवेवाडी, श्रीमंत संजयसिंह गायकवाड हायस्कूल, पिंपळे आणि कळे विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज कळे तसेच हमालांचे वाचनालय, दळवेवाडी या सर्वांना प्रत्येकी वीस दर्जेदार,वाचनीय पुस्तकांचा संच, ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांचा फोटो, वाचन प्रोत्साहनासाठी सन्मान चिन्ह समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
पन्हाळा तालुक्यात अशाप्रकारे जाहीररित्या ग्रंथदान कार्यक्रम प्रथमच पार पडला. प्रारंभी बोरगाव हायस्कूल चे मुख्याध्यापक डी.एस.लवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी बोलताना शिक्षक नेते बाबा पाटील यांनी जीवन साळोखे गेली अठरा वर्षे शाळाशाळांतून ग्रंथदान उपक्रम एकहाती राबवत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शालेय ग्रंथालय समृद्ध होण्यास चैतन्यमय वातावरण तयार झाल्याचे सांगितले. तर अजित रणदिवे, श्रीकांत पाटील यांनी जिल्ह्य़ातील प्रत्येक शालेय ग्रंथालय हे त्या शिक्षणसंस्थेचे वैभव ठरण्यासाठी ग्रंथदान उपक्रम, चळवळ होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता सांगितली.
आपल्या भाषणात प्राचार्य साळोखे यांनी वाचन संस्कृती जपण्याचे महत्त्व सविस्तर विशद करून विद्यार्थ्यांसह शिक्षक-पालकांनीही वाचते होण्याची गरज स्पष्ट केली. बदलत्या कुटुंब व्यवस्थेत फ्लॅट, मोबाईल, टीव्ही, फ्रीज या चौकटीत पुस्तकाचे स्थान नगण्य ठरत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते संजय पाटील-कोलोलीकर, जनसेवा संस्था समूहाचे सागर वरपे आदीसह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक हरिश्चंद्र शिंदे यांनी आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





