जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हजारो शिक्षक, सरकारी कर्मचारी कुटुंबियांसह रस्त्यावर : सकारात्मक निर्णय न घेतल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हजारो शिक्षक, सरकारी कर्मचारी कुटुंबियांसह रस्त्यावर : सकारात्मक निर्णय न घेतल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा 
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा नारा देत जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हजारो शिक्षक आणि सरकारी कर्मचारी आज रस्त्यावर उतरले. टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जुन्या पेन्शनसाठीचा लढा आणखी बुलंद केला. या मोर्चामध्ये सरकारी कर्मचारी व शिक्षक कुटुंबियांसह सहभागी झाले होते. शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी बोलताना सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरच्या लढाईबरोबरच सभागृहातही आवाज उठवू असा इशारा दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर या महिन्यापासूनच सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जातील.असा इशारा दिला.
सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले होते. शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मिळून पन्नासहून अधिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा नारा देत दुपारी टाऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली. वेगवेगळ्या सरकारी कार्यालयातील कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, शिक्षक यांनी जोरदार घोषणा देत मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. आमदार जयंत आसगावकर, निमंत्रक अनिल लवेकर हे मोर्चाच्या अग्रभागी होते.
मोर्चा टाऊन हॉल, सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी बोलताना निमंत्रक अनिल लवेकर म्हणाले, जुनी पेन्शन व सरकारी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या संदर्भात आमचा लढा सातत्याने सुरू आहे. सरकारने याकडे सकारात्मकतेने पाहून निर्णय घ्यावा. जुन्या पेन्शन योजनेच्या निर्णयास विलंब लागला तर सरकारी कर्मचारी या महिन्यापासूनच बेमुदत संपावर जातील.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सरकारने जुन्या पेन्शनचा विषय मार्ग लावावा या प्रश्नी चालढकल करू नये. जुनी पेन्शन संदर्भात सरकारने नेमलेल्या समितीचे कामकाज शंकास्पद वाटत आहे. शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसाठी रस्त्यावरच्या लढाई सोबतच सभागृहात देखील आवाज उठवू. यानंतर सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.
या मोर्चात सरकारी कर्मचारी संघटनेचे वसंत डावरे, संजय क्षीरसागर, शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी.लाड, भरत रसाळे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे एम.एम.पाटील, एम.एम.भाट, महसूल कर्मचारी संघटनेचे राहुल शिंदे, लखन खाडे, रमेश भोसले, गव्हर्नमेंट बँकेचे उपाध्यक्ष अजित पाटील, संजय खोत, प्रकाश पाटील, मनुजा रेणके, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एस. पाटील, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, मारुती दिंडे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, हरिदास वरणे, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे कुमार कांबळे, राणी शिरसाठ, नर्सिंग संघटनेच्या संघटनेच्या मंगल पाटील, हाश्मिता हावेरी, शिक्षक संघटनेचे राजेश वरक, राजेंद्र पाटील, दिलीप माने, विजय सुतार, राहुल बागडे, संध्या कोरे, वैशाली पाटील, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, अंकुश रानमळे सचिन पाडळकर, शिवाजी गुरव, प्रकाश गावडे पाटबंधारे विभागातील राजेंद्र गंधवाले, विक्रम राजपूत, अनिल खोत यांच्यासह शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





