जुनी पेन्शन मागणीसाठी १४ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बेमुदत संपात ताकदीनिशी सहभागी होण्याचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जुनी पेन्शन मागणीसाठी १४ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बेमुदत संपात ताकदीनिशी सहभागी होण्याचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा निर्णय

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यांच्या १४ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बेमुदत संपात पूर्ण ताकदीनिशी सहभागी होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत एकमताने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते. विद्याभवन, कोल्हापूर येथे सभा संपन्न झाली.
सर्व शासकिय, निमशासकिय कर्मचारी तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर जुनी पेन्शन मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मार्च २०२३ मध्ये ७ दिवसांचा बेमुदत संप केलेला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले होते. त्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. गेल्या नऊ महिन्यात जुन्या पेन्शन बाबत कोणताही ठाम निर्णय न घेतल्याने सर्व कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जुनी पेन्शन हक्काची असून ती मिळालीच पाहिजे म्हणून पुन्हा १४ डिसेंबर पासून बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांच्या संघटना संपात सहभागी होत आहेत. संप काळात सर्व संपावरील कर्मचारी दररोज सकाळी ११ वाजता टाऊन हॉल कोल्हापूर येथे एकत्रित येऊन सरकारचा निषेध करतील.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी संपात सहभागी होणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी आपआपल्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांना संपात सहभागी होत असलेले पत्र द्यावे व मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आपल्या संस्था चालकांना तसे पत्र द्यावे. तसेच त्याची एक प्रत व्यासपीठास द्यावी असे आवाहन केले.
यावेळी पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी नागपूरहून फोनवरून संप यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षक नेते दादा लाड, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यध्यक्ष भरत रसाळे, कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, डी. बी. पाटील विचार मंचचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार, प्रा. सी. एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, मिलींद बारवडे, सुदेश जाधव, काकासाहेब भोकरे, के. के. पाटील, एम. एन. पाटील, के. एस. पोतदार, आर. बी. पाटील, अरुण मुजुमदार, जयसिंग पोवार, सुरेश जाधव, श्रीधर गोंधळी, मनोहर पाटील, श्रीकांत पाटील, गजानन काटकर, संतोष आयरे, मनोहर जाधव, सुनिल कल्याणी, अनिल चव्हाण उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





