जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने १ ते ५ जानेवारी दरम्यान जनस्वास्थ्य अभियान राबविण्याचे आवाहन
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने १ ते ५ जानेवारी दरम्यान जनस्वास्थ्य अभियान राबविण्याचे आवाहन 
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
येथील जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे १ ते ५ जानेवारी २०२४ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळा स्तरावर जनस्वास्थ्य अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आरोग्य व पर्यावरण जागृतीसाठी गेली २३ वर्षे दरवर्षी दि. १ ते ७ जानेवारी या कालावधीत माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या स्तरावर जनस्वास्थ्य अभियान यशस्वीपणे राबवले जाते. यावर्षीही या अभियानाचे आयोजन केले आहे. अभियानात राबवावयाचे उपक्रम असे –
सोमवार दि.१ जानेवारी –
या दिवशीपासून रोज अभियान काळात जनस्वास्थ्य प्रतिज्ञा घ्यावी. तसेच या दिवशी विद्यार्थ्यांना आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता या विषयावर पोस्टर (17.5 × 24 इंच या आकारात) करण्यास सांगावेत व त्याचे अभियान काळात शाळेच्या आवारात प्रदर्शन मांडावे. त्यानंतर त्यातील पाच उत्कृष्ट पोस्टर्स जनस्वास्थ्य दक्षता समितीकडे जिल्हास्तरीय पोस्टर स्पर्धेसाठी पाठवावीत.
मंगळवार दि. २ जानेवारी –
या दिवशी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व, कचऱ्यापासून खत निर्मिती, हवा, पाणी यांचे प्रदूषण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, डॉल्बी, फटाके यांचे दुष्परिणाम, वाहतुकीचे नियम याबाबत प्रबोधन करावे.
बुधवार दि. ३ जानेवारी –
या दिवशी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे महत्त्व व त्याबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत प्रबोधन करावे.
गुरुवार दि. ४ जानेवारी –
या दिवशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स, किटकजन्य आजार आदी गंभीर आजाराबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करावे.
शुक्रवार दि. ५ जानेवारी –
या दिवशी सायं. ४ ते ५ या एकाच वेळी आपापल्या शाळेच्या प्रमुख रस्त्यावर गुटखा, तंबाखू, धूम्रपान आणि दारू यासारख्या व्यसनांच्या विरोधात मानवी साखळी आयोजित केली जाते पण यावेळी शासनाने जमावबंदी घोषित केल्यामुळे शहर भाग वगळून ग्रामीण भागात आपापल्या सोयीनुसार सदर मानवी साखळी आयोजित करावी.
या जनस्वास्थ्य अभियानाचा अहवाल तसेच अभियान राबवलेल्या आदर्श शिक्षकांची माहिती व पोस्टर्स १५ जानेवारी पर्यंत जनस्वास्थ्य दक्षता समिती,
आनंदवन, ए- 17, धन्वंतरी नगर ( आर के नगर परिसर) जुन्या म्हाडा कॉलनी जवळ, कोल्हापूर. या पत्त्यावर पाठवावीत.
संपर्क – दीपक देवलापूरकर, अध्यक्ष ( फोन नं. 9922111750 ),
बृहस्पति शिंदे, कार्यवाह ( फोन नं. 9422620076) जनस्वास्थ्य अभियान राबविलेल्या आदर्श शाळा, आदर्श शिक्षक व पोस्टर स्पर्धेतील विजेते विद्यार्थी यांचा कोल्हापूर येथील जाहीर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.
……………………………………….
अभियान काळात दररोज घ्यावयाची जनस्वास्थ्य प्रतिज्ञा अशी –
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देश बांधवांचे आरोग्य, सुख आणि समृद्धी यातच माझे आणि देशाचे सौख्य सामावले आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. कोठेही कचरा करणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळेन. प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळेन. ध्वनी प्रदूषण करणारे फटाके व डॉल्बी यापासून दूर राहीन. पाणी व ऊर्जेचा काटकसरीने वापर करेन. आणि दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करेन. तसेच गुटखा, तंबाखू, धूम्रपान आणि दारू सहित कोणत्याही व्यसनी पदार्थांचे सेवन करणार नाही व इतरांनाही या व्यसनी पदार्थांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन.
मी निर्धार व्यक्त करत आहे की, भारतीय संविधानाप्रमाणे असणारे सर्व कायदे, नियम व मूल्ये कसोशीने पाळेन. तसेच समाजामध्ये कोणताही भेदाभेद न करता भारतातील सर्व नागरिकांशी बंधू भावाने वागेन. आणि माझे घर, माझा गाव आणि माझा देश स्वच्छ, सुंदर, व्यसनमुक्त, आरोग्य संपन्न व सामर्थ्यशाली बनण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करेन.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





