कॉ. सुशिलाताई कुलकर्णी जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांना जाहीर
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
कॉ. सुशिलाताई कुलकर्णी जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांना जाहीर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक कर्मचारी व शिक्षक संघातर्फे दिला जाणारा कॉ. सुशिलाताई कुलकर्णी जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस यांना जाहीर करण्यात आला. डॉ गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या ‘तणकट’ या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
प्रा.डॉ.राजन गवस यांचा जन्म गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. मूळ गावी करंबळी (ता गडहिंग्लज) येथे त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. १९८० साली त्यांनी गडहिंग्लज येथून बी.ए. पूर्ण केले. १९८२ मध्ये शिवाजी विद्यापीठातून एम.ए.पदवी प्राप्त केली. त्यानंतर ‘भाऊ पाध्ये यांचे कथात्म साहित्य’ या विषयावर पी.एचडी. करून डॉक्टरेट प्राप्त केली.
श्री.मौनी विद्यापीठ, गारगोटी संचलित कर्मवीर हिरे महाविद्यालय येथे २३ वर्षे, पुणे विद्यापीठात २००५ ते २००७ या कालावधीत मराठीचे अध्यापन केले. सन २०१९ साली शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून मराठी विभाग प्रमूख म्हणून निवृत्त झाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील गडहिंग्लज गारगोटी या भागातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात डॉ.गवस यांची जडणघडण झाली. देवदासी व माकडवाला यांच्या चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. राष्ट्र सेवा दल आणि युक्रांतमध्ये त्यांची वैचारीक जडणघडण झाली. शोषितांविषयी आस्था, शेतकरी संस्कृतीचे वास्तव दर्शन आणि सामाजिक चळवळीतील आंतरविरोधाचे प्रत्ययकारी चित्रण, अमानवी धर्म श्रद्धांचा प्रतिवाद, सामाजिक जीवनाकडे पाहण्याचा नवनैतिक दृष्टीकोन आणि सीमावर्ती बोलींचा सर्जनशील वापर हे गवस सरांच्या साहित्य लेखनाचे विशेष आहे.
डॉ. गवस नामवंत लेखक कथा, कादंबरीकार, कवी, ललित गद्य लेखक म्हणून त्यांचा देश विदेशात नावलौकीक आहे. त्यांचा पाहिला कवितासंग्रह १९८३ साली प्रसिद्ध झाला. ग्रामीण स्त्रीयांच्या शोकात्मक कहाण्या या कवितेत प्रकटल्या आहेत. ‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या त्यांच्या कादंबऱ्या देवदासी, जोगत्यांना सोसाव्या लागणाऱ्या, दुःखाच्या व्यथा मांडणाऱ्या आहेत. स्त्रीयांच्या वाट्याला येणारी लैंगिक गुलामी, वंचितता, कौटुंबिक अध:पतन आणि सामाजिक अवहेलना ही आशयसुत्रे चौंडकं या कादंबरीत प्रथमतः प्रभावीपणे मांडली आहे. ‘भंडारभोग’ ही कादंबरी जोगत्यांच्या प्रथेचे वास्तव चित्रण करते. धर्मसत्ता पुरुषांचे पौरुषत्व नाकारून त्याला नपुसंक बनवते आणि दुःख, वेदना, अवलेहना हे त्यांच्या जीवनात वाट्याला येते याचे चित्रण या कादंबरीत येते. ‘धिंगाणा’ आणि ‘कळप’ या दोन कादंबऱ्यातून डॉ.गवस शिक्षित तरूण पिढीचे नवनैतिक दृष्टीकोनातून सामाजिक वास्तवाचे मूल्यमापन करतात. तरूणांच्या वाट्याला आलेली निराशा, भणंगपणा आणि प्रस्थापित राजकीय प्रवृत्तीचा मुजोरपणा ही सूत्रे त्यांनी ‘धिंगाणा’ कादंबरीत रेखाटली आहेत. भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला टक्कर देऊनही पदरी पडणाऱ्या निराशेचे चित्रण त्यांनी यात केले आहे.
‘कळप’ मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात साहित्य, राजकारण, शिक्षण, सांस्कृतिक चळवळी आदी व्यवस्थांमध्ये आलेल्या भ्रष्टतेमुळे उध्विघ्न, व्यथित झालेल्या तरुणाची कथा चित्रीत झाली आहे. ‘तणकट’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या कादंबरीमध्ये ग्रामीण संस्कृतीतील जातीय ताणतणाव, जात समूहांची अहंतेची मानसिकता, नेत्यांची भ्रष्ट मानसिकता, गावच्या एकसंघतेसाठी समूहभावाची अपरिहार्यता अशी सुत्रे व्यक्त झाली आहेत.
‘ब बळीचा’ ही कादंबरी २०१२ मध्ये प्रसिद्ध झाली. कृषी व्यवस्थेत सर्व स्तरावर सुरू झालेल्या भ्रष्टतेविषयीचे वास्तव ती मांडते. ‘रिवणावायली मुंगी’ आणि ‘आपण माणसात जमा नाही’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. काचाकवड्या, व कैफियत आणि लोकल ते ग्लोबल हे त्यांचे ललित गद्य संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘मराठीचे आशययुक्त अध्यापन’ आणि ‘सिमाभागातील मराठी बोली’ असे त्यांचे संशोधनावर आधारीत साहित्य उपलब्ध आहेत.
डॉ.राजन गवस यांना महाराष्ट्र शासनाचा ह.ना. आपटे पुरस्कार, ‘भंडारभोग’ या कादंबरीला ‘वि.स.खांडेकर पुरस्कार’ व संस्कृती प्रतिष्ठान, नवी दिल्लीचा ‘संस्कृती पुरस्कार’, उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, विखे पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा शंकर पाटील पुरस्कार, ‘भंडारभोग’ या कादंबरीला ‘ग.ल. ठोकळ पुरस्कार’, भैरूरतन दमाणी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, ‘तणकट’ला साहित्य अकादमी पुरस्कार, डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिका यांचा अनंत लाभसेटवार पुरस्कार, आनंदीबाई शिर्के पुरस्कार आदी विविध पुरस्कार मिळाले आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





