मुख्याध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सजगतेने व कार्यक्षमतेने स्वीकार करावा : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मुख्याध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सजगतेने व कार्यक्षमतेने स्वीकार करावा : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
नवीन शैक्षणिक धोरण ही भारतीय शिक्षण व्यवस्थेतील एक मोठी सुधारणा आहे. मुख्याध्यापकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सजगतेने व कार्यक्षमतेने या धोरणाचा स्वीकार करण्याचे आवाहन राधानगरी – भुदरगड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले.
स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड येथे कागल तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कागलच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी कागलच्या गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे होत्या.
आपल्या मनोगतात दीपक मेंगाणे पुढे म्हणाले, नविन शैक्षणिक धोरण लागू होण्यापुर्वी शिक्षण व्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. संकल्पना समजून घेण्यापेक्षा स्मरणशक्तीला प्राधान्य देणारी जूनी शिक्षण व्यवस्था होती. तसेच पारंपरिक विषय शिकण्यावर किंवा प्राविण्य मिळवण्यावर जास्त भर होता. पण येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सर्व त्रुटी आणि मर्यादांची दखल घेण्यात आली आहे. शिवाय व्यावसायिक आणि औपचारिक शिक्षण यातील अंतर कमी करण्याचा या नवीन शैक्षणिक धोरणाचा हेतू आहे. तसेच प्रवेश समानता, गुणवत्ता, परवडणारे, क्षमता आणि जबाबदारी या स्तंभावर आधारित हे धोरण आहे. शाश्वत विकासासाठी २०२० च्या अजेंठ्याशी संरेखित करणारे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र बहुविद्याशाखीय आणि लवचिक बनवणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी कागल तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व नव्याने रुजू झालेल्या मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध पदावरती निवड झालेल्या मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी स्व.सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.शिवाजीराव होडगे, मुरगुड हायस्कूल अँड ज्युनिअर काॅलेज, मुरगुडचे प्राचार्य शाम पाटील, शिवराज विद्यालय अँड ज्युनिअर काॅलेज मुरगुडचे प्राचार्य गजानन भोसले, कागल तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कागलचे अध्यक्ष अनिल खामकर, सुनिल शिंदे, अशोक वारके, शाकेरा मुजावर आदि मान्यवर व कागल तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार यांनी केले. आभार संघाचे सचिव अशोक बुगडे यांनी मानले तर सुत्रसंचालन कोजीमाशीचे संचालक अविनाश चौगले यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
