शिक्षणातील ‘भुदरगड पॅटर्न’ अबाधित ठेवण्यासाठी शिक्षक करत असलेले प्रयत्न गौरवास्पद : कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिक्षणातील ‘भुदरगड पॅटर्न’ अबाधित ठेवण्यासाठी शिक्षक करत असलेले प्रयत्न गौरवास्पद : कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के
गारगोटीत शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभ व ‘Respect to Child’ कॅलेंडरचे प्रकाशन संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
सध्या स्पर्धेचे युग असून सर्वच क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली आहे. पण निकोप स्पर्धा करुन विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी प्रयत्न व्हावेत. शिक्षणातील ‘भुदरगड पॅटर्न’ अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील शिक्षक करत असलेले प्रयत्न गौरवास्पद आहेत, असे उदगार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी काढले.
तुळशी लॉन, गारगोटी येथे शिक्षण विभाग, पंचायत समिती भुदरगडच्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. उदय शिंदे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबर संस्काराच्या रुजवणूकीची जबाबदारी शिक्षक, पालक आणि समाज यांच्यावर असते. या सर्व घटकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.
इ. ७ वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे सांगून डॉ.शिर्के म्हणाले, महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर काम करून देखील शिक्षणाच्या प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाच्या प्राथमिक गटाशी संवाद साधण्यासाठी आलो आहे.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, स्पर्धा परीक्षातून विद्यार्थी विविध स्तरावरील अधिकारी होणे अपेक्षित आहेच पण चांगला माणूस होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुलांच्या जाणिवा आणि संवेदना विकसित होण्यासाठी जाणीव जागृतीची शाळा निर्माण करावी. समाज निरोगी होण्यासाठी चांगले संस्कार करायला हवेत. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी तालुक्यात चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा अभिमान असल्याचे सांगून हीच परंपरा कायम ठेवायला हवी असे उद्गार काढले.
गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षक करत असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती देऊन तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला.
……………………………………….
चौकट :
‘Respect to Child’ कॅलेंडरचे प्रकाशन
भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळातील ९ हजार विद्यार्थ्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहचविण्यात येणाऱ्या आणि सुजाण पालकत्वाचा संदेश देणाऱ्या ‘Respect to Child’ या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले.
……………………………………….
यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख नंदकुमार मोरे, गटविकास अधिकारी डॉ.शेखर जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रा. डॉ. उदय शिंदे, माजी सभापती वसंत प्रभावळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, शिक्षण विस्ताराधिकारी उत्तमकुमार पाटील, निवृत्ती भाटले, आनंदराव जाधव, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एस.पाटील, रविंद्र नागटिळे, शिक्षक बँकेचे संचालक श्री.हळदकर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, वजीर मकानदार, केंद्रप्रमुख संजय कुकडे, संजय शिंदे व के.एस. पाटील, तानाजी सणगर, नाना देसाई, तुकाराम मातले, विनायक चौगले यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील १५६ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक टीमचा सत्कार करण्यात आला. याकामी सहकार्य करणाऱ्या प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष श्री.विशाल प्रभावळे, श्रीमती शर्वरी विवेक कुलकर्णी, सौ.अश्विनी रविंद्र भालेकर यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी आभार शिक्षण विस्ताराधिकारी प्रबोध कांबळे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
