सुजाण पालकत्वाचा संदेश देणारे ‘Respect to Child’ कॅलेंडर ९ हजार कुटुंबांपर्यंत पोहचवणार : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सुजाण पालकत्वाचा संदेश देणारे ‘Respect to Child’ कॅलेंडर ९ हजार कुटुंबांपर्यंत पोहचवणार : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे
राधानगरी व भुदरगड तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या दर्शनी भागात कॅलेंडरचा फ्लेक्स लावला जाणार
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळातील ९ हजार विद्यार्थ्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहचविण्यात येणाऱ्या आणि सुजाण पालकत्वाचा संदेश देणाऱ्या ‘Respect to Child’ या कॅलेंडरचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.
भुदरगड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत ‘Respect to Child’ या कॅलेंडरमधून पालकांना द्यावयाच्या संदेशाबाबत तसेच सदरचे कॅलेंडर तयार करुन विद्यार्थ्यांमार्फत पालकांना पोहचविण्याबाबत कल्पना मांडली. त्यास संमत्ती देऊन सर्वांनी सहभाग घ्यावयाचा निर्णय घेतला.
या कॅलेंडरचे प्रकाशन गारगोटीत समारंभपूर्वक करण्यात आले. सदरचे कॅलेंडर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळातील ९ हजार विद्यार्थ्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहचविले जाणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी ध्वजरोहण समारंभाप्रसंगी कॅलेंडर विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी दिली.
अलीकडे पालक प्रचंड स्पर्धाग्रस्त झाला आहे. त्यातून मुलांचे बालपण हिरावलं जात आहे. मुलाच्या मार्क्सच्या मागे पालक लागल्यामुळे त्याचा सर्वांगीण विकास होताना अडथळे निर्माण होत आहेत. पालक वर्गाकडून शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने विचारणा होत आहे. मुलाची क्षमता न बघता त्याला मार्क्स कमी पडल्याबद्दल विचारणा होते. यामुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या दर्जावर तसेच शाळेच्या गुणवत्तेवर शेरेबाजी केली जाते. अशा स्पर्धाग्रस्त परिस्थितीतून मुलाचं बालपण हिरावलं जात असल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांशी पालकांनी कशाप्रकारे वागावे, विद्यार्थ्याला घरातूनच प्रोत्साहित करणारे वातावरण कशाप्रकारे निर्माण करावे या अनुषंगाने ‘Respect to Child’ या कॅलेंडरच्या माध्यमातून दहा मुद्दे मांडले आहेत. मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासाला आकार मिळावा, पालकांनी चिंतन, मनन करावे आणि मुलांशी वागण्याबाबत योग्य बदल घडवावा या उद्देशाने हे कॅलेंडर पालकांपर्यंत पोहचवले जाणार असून राधानगरी व भुदरगड तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळेच्या दर्शनी भागात कॅलेंडरचा फ्लेक्स लावला जाणार आहे.
………………………
शिक्षण विभाग, पंचायत समिती, भुदरगड प्रायोजित या उपक्रमातून सुजाण पालकत्वाचा संदेश देणारे ‘Respect to Child’ ९ हजार कुटुंबांपर्यंत दिले जाणाऱ्या या कॅलेंडर मधील मजकूर असा
प्रिय आई व बाबा,
स्पर्धेचे युग म्हणून, माझे केवळ गुणपत्रक उत्कृष्ट व्हावे यासाठी धडपडणारे आपण, माझ्या व्यक्तीमत्वानेही उत्कृष्ट आकार घ्यावा, यासाठी खालील बाबींवर विचार कराल, ही अपेक्षा…..
मुलाला जसे वाढवले जाते, तसे त्याचे व्यक्तीमत्व आकार घेते..
मुलावर सारखी टीका केली तर ते इतरांस तुच्छ लेखण्यास शिकते.
मुलाशी कायम शत्रुभावाने वागाल, त्यांची सारखी टर उडवाल, तर ते भांडायला शिकेल.
तुम्ही त्याला सारखेच लाजवाल किंवा खजील कराल तर आपण स्वतः दोषी आहोत, असे त्याला वाटायला लागेल.
तुम्ही त्याच्याशी सहनशीलतेने वागाल, तर ते सोशिक होण्यास शिकते.
• मुलाला उत्तेजन द्याल, तर त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.
मुलाची स्तुती कराल, तर ते दुसऱ्याची योग्यता ओळखण्यास शिकते.
मुलाशी प्रामाणिकपणे वागाल तर ते न्यायप्रिय होते.
मुलाला सुरक्षितता द्याल, तर ते विश्वास ठेवण्यास शिकते.
मूल पसंतीच्या वातावरणात वाढले, तर ते स्वतःवर प्रेम करण्यास शिकते.
मित्रत्वाच्या व अनुमतीच्या वातावरणात मूल लहानाचे मोठे झाले की, ते दुनियेत प्रेम शोधायला शिकते.
तुमचा / तुमची

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
