सातत्यपूर्ण प्रयोग व जिज्ञासेतून सर्वात मोठे ध्येय गाठता आले : सचिन देसाई
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
सातत्यपूर्ण प्रयोग व जिज्ञासेतून सर्वात मोठे ध्येय गाठता आले : सचिन देसाई
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत राज्यात अव्वल ठरलेल्या सचिन देसाई यांचा व्हिडिओ निर्मितीच्या प्रेरणादायी प्रवासाचा
आढावा
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी (सागर मोरे)
सध्या सोशल मीडियावर शैक्षणिक व्हिडिओची कमी नाही. पण दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ म्हटलं की ‘सचिन देसाई’ असं एक समीकरणच बनलं आहे. विद्यार्थी, शिक्षक वा पालक असोत, एखादा शैक्षणिक व्हिडिओ यु-ट्यूब चैनल, दीक्षा ॲप वा सोशल मीडियावर पहायचा असेल तर या नावाने प्राधान्याने शोधला जातो. तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर…सुंदर व ओघवत्या भाषेत दिलेले स्पष्टीकरण… समर्पक उदाहरणे व दाखले यांचा वापर…उत्कृष्ट ऍनिमेशन व अनुरुप संगीत योजना… या साऱ्यांचा मिलाफ देसाई यांच्या व्हिडिओ निर्मितीत आवर्जून पहायला मिळतो. यावर्षी शासकीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत पुनः एकदा अव्वल स्थानी आलेल्या सचिन देसाई यांचे व्हिडिओ निर्मितीचे कौशल्य लक्षवेधी ठरले आहे. या निमित्ताने त्यांच्या व्हिडिओ निर्मितीच्या प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा आढावा.
२०१६ साली भूषण कुलकर्णी यांच्या राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर त्यांना व्हिडिओ निर्मितीची पहिली आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी कल्पकतेने वेगळ्या प्रकारचे प्रयोग व्हिडिओ निर्मितीत करण्यास सुरुवात केली. वेगळ्या प्रकारचे ॲप्स,सॉफ्टवेअर कशा प्रकारे प्रभावीपणे वापरायचे? याची माहिती जाणून घेतली. याच साली स्वतःचे यु-ट्यूब चॅनेल सुरू करून यावर हे सर्व व्हिडिओ प्रसिद्ध करायला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ निर्मितीला उदंड प्रतिसाद मिळत गेला. अल्पावधीतच त्यांचे ‘स्मार्ट एज्युकेशन’ हे यु-ट्युब चॅनेल महाराष्ट्रातील एक लोकप्रिय यु-ट्यूब चैनल बनले. २०१८ साली त्यांना ‘महाराष्ट्र बेस्ट यु-ट्यूब टीचर’ हा राज्यस्तरीय अवॉर्डही मिळाला. याच वर्षी घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत त्यांचा राज्यात प्रथम क्रमांक आला. २०१८ ला त्यांची बदली आजरा तालुक्यातील सर्वात अतिदुर्गम असणाऱ्या अवंडी धनगरवाडा क्र.३ या शाळेत झाली तरीदेखील त्यांनी आपला छंद सोडला नाही. परिसरातील निसर्ग व प्राणीजीवनाचे जीवंत चित्रीकरण करून ‘ओढाळ वासरू’ या कवितेवर निर्मिती केलेल्या ई-साहित्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला. आज अखेर या व्हिडिओला यूट्यूबवर नऊ लाख इतक्या लोकांनी पसंती दाखवली आहे. कोरोना काळात आपल्या शाळेबरोबर महाराष्ट्रातील इतर शाळेतील मुलांचे शिक्षण चालू राहावे यासाठी त्यांनी ‘हॅप्पी लर्निंग एट होम’ ही एक विशेष ऑनलाइन ॲनिमेटेड व्हिडिओ सिरीज ऑनलाइन टेस्टसह चालू केली. या संघर्षाच्या काळात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरली. भूगोल सारखा किचकट वाटणारा विषय सहज सुलभ व्हावा यासाठी त्यांनी ‘चला करू भूगोलाशी मैत्री’ मालिका सुरु केली. त्यांच्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त नवोपक्रम कृती आधारित व्हिडिओ मालिका प्रकाशित झाल्या आहेत, ज्यामधून कोणकोणत्या नाविन्यपूर्ण विद्यार्थी कृती घेता येतात, याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. देशभक्तीवर बनवलेले अनेक माहितीपट सर्वांच्यासाठी दिशादर्शक राहिले आहेत. यापैकीच डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित बनवलेला मराठी भाषिक ‘उडान’ हा माहितीपट मैलाचा दगड बनला. प्रदर्शित होताच युट्युब वर याने अल्पावधीतच एक लाखाचा टप्पा पूर्ण करण्याची किमया केली. यासह बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी बालकांचे वक्तृत्वविश्व, पक्का पाया पहिलीचा, पहिले पाऊल आनंदी शिक्षणाची चाहूल, लक्षात ठेव मुला हुशार व्हायचं तुला, शिकू आनंदे, माझी ऑनलाइन शाळा यासारख्या शैक्षणिक मालिका विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासाठी पर्वणीच ठरल्या आहेत. इतकेच काय त्यांच्या बशाचामोळा या शाळेची संघर्षगाथा त्यांनी ‘एक दिशा परिवर्तनाची’ या व्हिडिओ मालिकेद्वारे प्रदर्शित केली. यातून एक सहानुभूतीची लाट राज्यभरातून तयार झाली आणि लाखो रुपयांची देणगी या शाळेस प्राप्त होण्याचा अभूतपूर्व इतिहास घडला.
पॉवर पॉइंटचा व्हिडिओ निर्मितीत प्रभाविपणे कसा वापर करता येतो ? हे त्यांनी व्हिडिओ निर्मिती कौशल्यातून दाखवून दिले आहे. क्रोमा इफेक्ट चा प्रभावी वापर करत त्यांनी महाराष्ट्रातील मुलांचे पहिले न्यूज चैनल सुरू केले. बोलक्या बाहुल्यांचा खेळ यावर आधारित मनोरंजक शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा त्यांनी बनवले आहेत. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक साहित्य निर्मिती वर आधारित सुद्धा मालिका त्यांनी प्रदर्शित केली आहे. कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता अनुभवातून व ज्ञान संशोधनातून त्यांनी हे कौशल्य प्राप्त करत त्याचा उपयोग शिक्षण व मनोरंजन करण्यासाठी केला आहे. २०२३मध्ये शासनाने सर्व माध्यमाच्या शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये त्यांना राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आजवर अविरत केलेल्या कष्ट व परिश्रमाचे सर्वात गोड फळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी होऊन शिक्षण समृद्ध व्हावे, यासाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी ‘राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती’ या खुल्या व अभिनव स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. इ.१ ते १२ वी विषयनिहाय गट करुन यामध्ये तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत भरघोस बक्षीसे सुद्धा ठेवली होती. या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित स्पर्धेचा राज्यस्तर निकाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याकडून नुकताच घोषित करण्यात आला असून यामध्ये भुदरगड तालुक्यातील विद्या मंदिर नाधवडे येथे कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक सचिन देसाई यांनी इयत्ता ६ वी ते ८ वी समाजशास्त्र विषय गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत त्यांनी इयत्ता ७ वी भूगोल विषयातील ‘सूर्य, चंद्र व पृथ्वी’ या महत्वपूर्ण घटकावर आधारित व्हिडिओ बनवला होता. या पुरस्काराचे वितरण नुकतेच पुणे येथे पार पडले. विजेते शिक्षक सचिन देसाई यांना ५० हजार किमतीचा धनादेश,शिल्ड,मेडल व प्रमाणपत्र प्रदान करुन गौरवण्यात आले.
यावेळी शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर, प्रधान सचिव आय.ए. कुंदन, सहसचिव अर्चना अवस्थी, प्रकल्प संचालिका आर. विमला,आयुक्त सूरज मांढरे, संचालक राहुल रेखावार, आयटी विभाग प्रमुख योगेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थितीत होते. अशा स्पर्धेतून दर्जेदार विद्यार्थी घडतील, असा विश्वास राज्य शिक्षण सचिव श्रीमती कुंदन यांनी व्यक्त केला. स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल राज्यभरातील शिक्षकांचेही कौतुक केले. या स्पर्धेत केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडिओ बनवणे बंधनकारक होते. विविध निकषाच्या आधारे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओचे वस्तुनिष्ठ परीक्षण करण्यात आले. राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या एकूण ८४ शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. यातील उत्कृष्ट ठरलेले सर्व ई-साहित्य शासनाच्या वेबसाइटवर लवकरच उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
पुरस्कार विजेते शिक्षक सचिन देसाई यांचे दीक्षा साहित्य निर्मितीतही महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांचे २३ ई-साहित्य दीक्षा वर उपलब्ध आहेत. स्वनिर्मित ‘स्मार्ट एज्युकेशन’ या शैक्षणिक यू टयूब चॅनेलला सुद्धा यापूर्वी विशेष पुरस्कार मिळाला असून यावर ४०० हून अधिक शैक्षणिक व्हिडिओ देसाई यांनी तयार करुन अपलोड केले आहेत. विक्रमी १ कोटी भेटीचा टप्पा देखील हे उपयुक्त चॅनेल पूर्ण करत आहे. यावर्षी देसाई यांनी शासकीय नवोपक्रम स्पर्धेतही राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांची सर्व क्षेत्रातील यशस्वी कामगिरी पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना गतवर्षी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देखील बहाल केला आहे. आजच्या या विशेष यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिक्षणाधिकारी मिना शेंडकर, डॉ.एकनाथ आंबोकर, डायट प्राचार्य राजेंद्र भोई, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, विस्ताराधिकारी प्रबोध कांबळे, उत्तमराव पाटील, केंद्रप्रमुख डी. डी. पाटील यांच्यासह सर्व स्तरातील शिक्षणप्रेमीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
——
चौकट: ज्ञानदानासाठी तंत्रज्ञानाची कास…
● आजपर्यंत ४०० हून अधिक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती.
●व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत तीन वेळा राज्यस्तरीय सुयश.
●स्वनिर्मित यु-ट्यूब चैनलला विक्रमी प्रतिसाद ३५ हजार सबस्क्राईबर सह ७५ लाख भेटी पूर्ण.
●विविध क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.
●यावर्षी शासकीय नवोपक्रम स्पर्धेतही राज्यात प्रथम क्रमांक.
●विविध शैक्षणिक मालिकांचे प्रसारण.
●राज्य व जिल्हास्तरीय कार्यशाळेतून शिक्षकांना व्हिडिओ निर्मितीचे मार्गदर्शन.
●देशभक्तीवर आधारित माहितीपट निर्मिती.
● राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारासाठी दोन वेळा नामांकन

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
