२०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील प्रथम सत्रात जिल्ह्यातील शाळांना एक हजार वाचनीय पुस्तकांचे वाटप : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम सुरुच
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील प्रथम सत्रात जिल्ह्यातील शाळांना एक हजार वाचनीय पुस्तकांचे वाटप : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम सुरुच
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील पहिल्या सत्रात आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत एक हजार पुस्तके ग्रंथभेट देण्याचा टप्पा ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी पूर्ण केला आहे. हातकणंगले तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या पन्नास शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकांना या पुस्तकांचे वाटप त्यांनी केले आहे.
गेली एकोणीस वर्षे सातत्याने “एकहाती ग्रंथदान उपक्रम” राबवणारे प्राचार्य जीवन साळोखे यांनी आजपर्यंत जिल्ह्यातील शालेय ग्रंथालये व सार्वजनिक वाचनालयांना सुमारे पंधरा हजार पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. या शैक्षणिक वर्षात त्यांनी दोन हजार पुस्तके देण्याचा संकल्प जाहीर आहे. तसेच आण्णाभाऊ साठेंच्या पाच-पाच कादंबर्यांचे दोनशेहून अधिक खंड ते शालेय ग्रंथालयांना देत आहेत.
समृद्ध शालेय ग्रंथालय अभियान आणि वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान असा हा उपक्रम प्राचार्य जीवन साळोखे हे प्रत्यक्ष कृतीतून एकहाती अखंडपणे राबवत आहेत.
दरम्यान जुलै- २०२४ मध्ये त्यांनी रुकडी परिसरातील पंचवीस माध्यमिक शाळा व वाचनालयांना पाचशेहून अधिक ग्रंथभेट दिली आहे. तसेच हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव विभागातील माध्यमिक शाळा व वाचनालयाना चारशेहून अधिक पुस्तके
“वाचन प्रेरणा दिनाच्या” पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर रोजी पेठ वडगाव येथे ग्रंथदान समारंभात ग्रंथभेट म्हणून दिली. प्रत्यक्ष “ग्रंथभेट” देवून त्यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा केला आहे.
आजपर्यंत कागल, भुदरगड, राधानगरी, गडहिंग्लज,करवीर, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यासह इचलकरंजी शहरातील अशा दोनशे पन्नासहून अधिक माध्यमिक शाळांना वेगवेगळ्या निमित्ताने प्राचार्य जीवन साळोखे यांनी ग्रंथभेट दिले आहेत.
विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग अधिक वाचते होण्यासाठी हा उपक्रम यापुढेही जिल्ह्य़ात गतीने राबवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी, शिक्षक, पालकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space