नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सावित्रीच्या लेकीचा प्रवास…! – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

सावित्रीच्या लेकीचा प्रवास…!

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्ञानप्रबोधिनी लाईव्ह विशेष

सावित्रीच्या लेकीचा प्रवास…!

कृत्रिमतेचा स्पर्श नसलेल्या शब्दरचनेमुळे वाचकवर्ग प्रा.सुषमा पाटील यांच्या ‘पुसट रेषा..ठळक रेषा’ या लेख संग्रहास भरभरून प्रतिसाद देईल : ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे

प्रसिद्ध व्याख्यात्या प्रा.सुषमा पाटील यांचा पहिला लेखसंग्रह “पुसट रेषा..ठळक रेषा” हा अभिनंदन प्रकाशन,कोल्हापूर यांनी नुकताच थाटात प्रकाशित केला. या लेखसंग्रहास ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी लिहीलेल्या प्रस्तावनेतील हा भाग..

सध्याच्या काळात व्यवहारी दुनियेत वावरताना लोक परस्परांशी कसे वागतात हे आपण पाहतो. सभ्यता नम्रता आणि स्वभावातील मृदुता या गोष्टींचा अभावच त्या -त्यावेळी प्रामुख्याने आपल्याला जाणवतो..! खरंतर इंग्रजीत एक विधान आहे..,
Having a soft heart in cruel world, is courage, not weakness..!

समोरच्याशी बोलताना, वागताना, माझ्या संपर्कातील या तरुण शिक्षिकेच्या स्वभावातील सभ्यता आणि सौजन्य याचा अनुभव मला जसा सुरुवातीच्या भेटीत आला तसाच तो पुढे येत राहिला. अशा प्रकारचा अनुभव अनेकांना आल्याचे मला कळून आले. हा गुण या शिक्षिकेच्या स्वभावातील संवेदनशीलता आणि भावनिकतेचे प्रतिक असल्याचे मला जाणवले. खरं तर, पाच सहा वर्षांपूर्वी एका शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्ताने या शिक्षिकेची भेट झाली. संयोजकांनी ओळख करून दिली‌. त्या कार्यक्रमाच्या या शिक्षिका सूत्रसंचालिका होत्या. त्यांचे ते निवेदन ओघवते व श्रोत्यांची मने जिंकणारे होते. पाल्हाळपणा टाळून केल्याने ते वेधक ठरले. पुढील काळात, वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांची भेट होऊ लागली. त्या- त्यावेळी झालेल्या बोलण्यातून, संभाषणातून त्यांचा जीवनपट उलगडत गेला. त्यांच्या स्वभावाचे पैलू कळू लागले..!
आपण एक शिक्षिका आहोत , याचे नेहमी भान ठेवून ,आपल्या मर्यादा सांभाळून, क्षमता ओळखून त्या वाचन,अध्यापन,लेखन वकृत्व ,सूत्रसंचालन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन या क्षेत्रात धीमेपणाने पुढे जात राहिल्या. प्रगती करत राहिल्या. या काळात, सतत नवीन गोष्टी शिकण्याची उर्मी, त्यांच्यातील जिज्ञासूपणा आणि कुतूहल जागते असल्याची साक्ष देत होते…! तशा या शिक्षिका ग्रामीण भागातून आलेल्या.., कोल्हापूरापासून दक्षिणेकडे 50 किलोमीटर दूर असणाऱ्या एका खेड्यात त्या जन्मलेल्या. आई वडील सामान्य शेतकरी , अल्पशिक्षित . ओढाताणीची आर्थिक परिस्थिती . अगदी जेमतेम अशीच. तिचे दहावी आणि बारावीचे शिक्षण त्याच भागात झालेले. पण प्रतिकूल परिस्थितीतही या तरुणीने अव्वल गुणवत्तेची कास कधी सोडली नाही..! बारावीनंतर डी.एड.झाल्यावर लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर, ग्रामीण भागात जे सार्वत्रिक चित्र दिसते ; तेच या तरुणीच्या वाट्याला आले..! मात्र आपली स्वप्नं तिने मावळू दिली नाहीत .लग्न झाल्यावरही त्या तरुणीचा जिद्दी स्वभाव तिला गप्प बसू देईना . नवऱ्याच्या संमतीने आणि मार्गदर्शनाने ती शेजारच्या विद्यानगरीत विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून रूजू झाली. नोकरी , घर, संसार सांभाळत तिने पुढील शिक्षणाचा मार्ग धरला, न थांबता…! आता जिद्दीला साथ होती चिकाटीची, नव-याच्या भक्कम सोबतीची..! त्यामुळे पुढचे शिक्षण ती घेत गेली. बी.ए; बी.एड; एम. एड.पर्यतचे सगळं शिक्षण तिने काॅलेजची पायरीही न चढता, शिवाजी विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बहि:स्थ म्हणूनच घेतले..! एम.ए. ची पदवी तर मराठी, हिंदी, समाजशास्त्र या तीन वेगवेगळ्या विषयातून विशेष गुणवत्तेसह तिने संपादन केली..! मात्र आपल्या अव्वल शैक्षणिक गुणवत्तेचा तिने कधी स्वतः ला अहंकाराचा किंवा आढ्यतेचा स्पर्श होऊ दिला नाही…! विशेष म्हणजे सध्याच्या काळात, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा नव्हे, हळकुंडाच्या वासाने “पिवळेपण” मिरवणा-या या दुनियेत ही तरुण शिक्षिका आपल्या गुणवत्तेचा नंदादीप सतत तेवत ठेवत राहिली..!

पुढे एका वळणावर,हा विनाअनुदानित नोकरीचा खडतर काळ संपला आणि जिल्हा परिषदेच्या नामवंत असणा-या एम. आर. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गडहिंग्लजमध्ये रिक्त जागेवर , खुल्या प्रवर्गातून मुलाखतीद्वारे, गुणवत्तेच्या बळावर तिची नियुक्ती झाली…! पुन्हा एकदा ही नवलपूर्ण घटना ( सध्याच्या काळात ) तिच्या आयुष्यात घडली. ज्युनिअर कॉलेजमधील ही प्राध्यापिकेची सेवा सुरू असताना, आपण एक “शिक्षिकाच” आहोत, याचे भान तिने कायम ठेवले…!पुढे वैयक्तिक पदाला मान्यता किंवा बदलीचे प्रकरण असो, पुन्हा एकदा येथेही खडतर प्रवास तिच्या वाट्याला आला . हा प्रवास तब्बल पाच- सहा वर्ष सुरू राहिला.एका टप्प्यावर बदलीच्या ठिकाणी राहणे अनिवार्य झाले. त्यावेळी बदलीचे ठिकाण गडहिंग्लज ते कोल्हापूर असा आलटून -पालटून प्रवास या शिक्षिकेच्या पतीच्याही नशिबी आला. पण ही सारी ससेहोलपट, हा मनस्ताप सहन करत असतानाच , दोन मुली तिच्या संसार वेलीवर उमलल्या होत्या. नोकरी ,घर, संसार, पदरातील दोन मुलींचा सांभाळ करत, सासरशी ठेवावा लागणारा संपर्क.., या सगळ्या ताणतणावात या जिद्दी शिक्षिकेने आपल्या अंतकरणातील नव्याने शिकण्याच्या उर्मीना, कौशल्यांना करपू दिलं नाही की, चेहऱ्यावरचे हास्य हरपू दिलं नाही..!

अखेरीस “खुदा के घर देर है, अंधेर नही..! ” या उक्तीप्रमाणे या शिक्षिकेला न्याय मिळाला. न्यायप्रविष्ठ असलेल्या बदली प्रकरणाचा तिच्या बाजूने निकाल लागला. आयुष्यातील एक महत्त्वाची लढाई यावेळी तिने जिंकली होती. पण दरम्यानच्या काळात, उपेक्षा आणि अपेक्षाभंगाचे अनेक घाव, अपमानास्पद प्रसंग वाट्याला येऊनही, या तरूण शिक्षिकेने कधी कुणाबद्दल कटूता बाळगली नाही की कुणावर आगपाखड केली नाही.., चांगुलपणाची कास सोडली नाही.. की नशिबाला दोष दिला नाही..! नेहमी सर्वांच्या भल्याचा विचार केला. सतत आशावादाचा पुरस्कार केला. संवेदनशील मनाची होणारी घुसमट भाषणातून, तर कधी लेखनातून ती संयमाने प्रकट करू लागली. त्यातूनच वाणीचे तेज तिच्या लेखणीला येऊ लागले ..आणि मनात साचलेल्या… हळव्या “पुसट रेषा” हळूहळू “ठळक रेषा” होऊ लागल्या…,” अक्षररुपाने त्या कागदावर उतरू लागल्या..! त्यातही वाट्याला आलेल्या कटू घटना -प्रसंगांची खडतर वाटचालीतील अनुभवांचा,भवताली वावरणाऱ्या लोकांचा विपरित अनुभव वाट्याला येऊनही त्यातील कर्कशपणा टाळून, कोणालाही दोष न देता, ही शिक्षिका अत्यंत संयमाने आपल्या व्यथा- वेदना व्यक्त करू लागली…!
हा अविष्कार म्हणजेच “सावित्रीच्या एका लेकीचाच हुंकार होता..!” त्यातूनच आकारास आला, *’पुसट रेषा..ठळक रेषा’ हाच तो लेखसंग्रह ..!* वाचनीय आणि संवेदनशील अशा ३९ लेखांचा समावेश या संग्रहात आहे. ..आणि या संग्रहाच्या लेखिकेचे नाव आहे…, प्रसिद्ध व्याख्यात्या आणि निवेदिका प्रा. सौ. सुषमा अरुण पाटील..! अत्यंत सुबोध, भावस्पर्शी लेखनशैली, प्रत्येक लेखाच्या आटोपशीर मांडणीमुळे सर्व लेख वाचनीय झाले आहेत. लेखांचे विषय आपल्या अवती-भवती घडणारे आहेत. कृत्रिमतेचा स्पर्श नसलेल्या शब्दरचनेमुळे वाचकवर्ग या लेख संग्रहास निश्चित भरभरून प्रतिसाद देईल अशी खात्री आहे…!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30