दलित चळवळीचे आधारवड : दलितमित्र बी.डी.कांबळे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
दलित चळवळीचे आधारवड : दलितमित्र बी.डी.कांबळे
चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
भुदरगड तालुक्यातील दलित चळवळीचे आधारवड, मागासवर्गीय वसतिगृह चळवळीतील प्रमुख मार्गदर्शक, श्री.आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव दलितमित्र बी.डी.कांबळे यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्याबद्दल…..
पांगिरे (ता.भुदरगड) गावात ५ ऑगस्ट १९४२ रोजी जन्मलेल्या भीमराव धोंडीबा तथा बी.डी.कांबळे यांनी परिस्थितीशी झुंज देत शिक्षण घेतले. गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी गारगोटीतील श्री.मौनी विद्यापीठाच्या श्री.शाहू कुमार भवन येथे प्रवेश घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे माध्यमिक शिक्षण घेताना श्री.अमरनाथ कांबळे विद्यार्थी वसतिगृहात राहून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिक झाल्यानंतर उपजीविकेसाठी श्री.मौनी विद्यापीठात हेलन मुस यांनी सुरु केलेल्या सेवाभावी दवाखान्यात काम स्वीकारले. काही वर्षे मुस यांच्या दवाखान्यात काम केल्यानंतर त्यांना श्री.शाहू कुमार भवन या शाळेत शेती शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, संयुक्त प्रशिक्षण केंद्रात काम केले.
श्री.मौनी विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्रात काम करत असताना त्यांच्याकडे श्री.अमरनाथ कांबळे विद्यार्थी वसतिगृहाचे सहाय्यक अधीक्षक म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. पुढे अधीक्षक म्हणून त्यांनी सलग २० वर्षे काम केले. ज्या वसतिगृहामुळे शिक्षण घेता आले त्या वसतिगृहाचा अधीक्षक म्हणून जबाबदारी मिळाल्यामुळे अतिशय आनंदाने काम स्वीकारले. अधीक्षक पदाच्या काळात शेकडो मागासवर्गीय मुलांना मार्गदर्शन करून जीवनात यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. याच कालावधीत वसतिगृहाचे संस्थापक कै.अमरनाथबुवा कांबळे यांचा पुतळा उभारणीसाठी त्यांनी मोलाचा सहभाग घेतला. वसतिगृहातील प्रवेशाची मर्यादा लक्षात घेता तालुक्यासह परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागत होते. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी संख्या वाढणे आवश्यक होते. पण ते शक्य नसल्याने नव्याने वसतिगृहे सुरु झाली पाहिजेत असा विचार डोळ्यासमोर ठेऊन १९८५ साली श्री.आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात
प्राचार्य डॉ. आर. एस. कांबळे यांच्या सहकार्याने त्यांनी पुढाकार घेतला. त्याच वर्षी गारगोटी येथे श्री.राजर्षी शाहू विद्यार्थी वसतिगृह सुरु केले. यामुळे अनेक वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली. त्यानंतर चार विद्यार्थी वसतिगृहे सुरू केली सध्या भुदरगड तालुक्यात गारगोटी व मिणचे खुर्द तर गडहिंग्लज तालुक्यात गडहिंग्लज व नेसरी येथे विद्यार्थी वसतिगृहे सुरु आहेत. या चार वसतिगृहांना सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदान मिळते. या वसतिगृहामुळे सुमारे १२५ मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सोय झाली आहे.
दलितमित्र बी.डी.कांबळे यांनी पाल (ता.भुदरगड) येथे म.फुले मागासवर्गीय दूध संस्था या नावाने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या मागासवर्गीय दूध संस्थेची स्थापना केली. या संस्थेमुळे मागासवर्गीय समाजातील लोकांना दुग्धव्यवसायाकडे वळविण्यात यशस्वी ठरले. तालुक्यात मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था व्हावी यासाठी परिश्रम घेतले. तालुक्यातील दलित चळवळीत नेहमी अग्रभागी राहिले आहेत. समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा, बळ देण्याचे काम त्यांनी केले. नोकरी करत असताना समाजाचे देणे लागतो या भावनेने त्यांनी केलेले काम दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या कामाचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने २००२ – २००३ या वर्षात त्यांना मानाचा ‘दलितमित्र’ पुरस्कार देऊन गौरविले. ते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांनी दलितमित्र पुरस्काराची रक्कम समाजातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी श्री.शाहू कुमार भवन या शाळेच्या नावे ठेव म्हणून ठेऊन त्याच्या व्याजातून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मदत दिली जाते.
भुदरगड तालुक्याच्या ठिकाणी बौध्द विहार झाले पाहिजे यासाठी दलितमित्र बी.डी.कांबळे यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात गारगोटीत बौध्द विहारासाठी जागा उपलब्ध करण्यात आम्हाला यश मिळाले. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नाने पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून बौध्द विहाराचे बांधकाम सुरु झाले आहे. नजिकच्या काळात बौध्द विहाराची भव्य वास्तू उभा राहील. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
दलितमित्र बी.डी.कांबळे यांना चौदाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन …
शब्दांकन : श्री.व्ही.जे.कदम, अध्यक्ष, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळ, गारगोटी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
