वणव्यात होरपळलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणी देत, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
वणव्यात होरपळलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणी देत, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबियांनी तळेमाऊली जंगल भाग व रस्त्याच्या दुतर्फा आगीत होरपळलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणी देत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा कौतुकास्पद उपक्रम राबविला.
मार्च, एप्रिल महिन्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लावण्याचे प्रकार पहायला मिळतात. रात्रीच्या वेळी उंच ठिकाणाहून सभोवती पाहिल्यास कुठल्या न कुठल्या डोंगर रांगेत लालभडक वनव्याची रेषा दिसतेच, यास कारणेही खूप आहेत. मुळाशी जाऊन पाहिले तर गवत पेटवल्याने नवीन येणारे गवत चांगले येते हा गोड गैरसमज..शिवाय अलीकडे जंगलांना नवीन समस्यांनी ग्रासले आहे. पर्यटनाच्या नावाखाली फक्त आणि फक्त मौजमजा हा हेतू ठेऊन जंगल संस्कृतीचे नियम लाथाडीत जंगलांमध्ये घुसखोरी करायची, मौजमजा जेवणावळी बरोबरच आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे जगाला दाखवण्यासाठी झाडांना लोंबकाळत, फांद्या व पाने ओरबाडत फोटोग्राफी करायची. जाता जाता वाळलेल्या गवतावर काडी पेटवून टाकायची व अघोरी आनंद मिळवायचा हे सर्रास पाहायला मिळतेय. यातून निसर्गाचा समतोल बिघडून सरपटणारे प्राणी, पक्षी, वन्यजीव, छोटे छोटे कीटक, जीवजंतू, झाडे -वेली, वनौषधी यांची न भरून निघणारी हानी होते, यासाठी वनविभागाने आगी लावणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करायला हवी.
वणवे लावून मानव जात निसर्ग चक्रामध्ये ढवळाढवळ करीत आहे, त्यामुळेच जागतिक तापमान वाढीसारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनावर लक्ष केंद्रित व्हायला हवे, आणि हा हेतू घेऊन पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबीयांनी तळेमाऊली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा व जंगल भागातील वणव्याच्या भक्षस्थानी पडलेल्या, होरपळलेल्या झाडांना टँकरद्वारे हजारो लिटर पाणी देत त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण केली.
सदर उपक्रमात पर्यावरणमित्र अवधुत पाटील, मिथाली पाटील, जान्हवी पाटील, दत्तात्रय देसाई, शंभू देसाई, विकास घरपणकर, ओंकार दबडे, हरी देसाई आदींनी सहभाग घेतला, इंडियन आर्मीचे सुधीर येमगेकर, अडव्होकेट पृथ्वीराज चौगुले, विद्या मंदिर पळशिवणेचे अध्यापक श्री. बागूल यांचे विशेष सहकार्य लाभले.
चौकट : जैवविविधतेतील प्रत्येक घटक आपापली काळजी घेतात, नियम पाळतात, अनुकरण करतात पण आपण माणूस प्राणी निसर्ग नियमांचे उल्लंघन करुन पृथ्वीस घातकच ठरत आहोत. पृथ्वी सर्वांग सुंदर बनविण्यासाठी मानवाने कृत्रिम जीवनाचा त्याग करुन नैसर्गिक जीवन अंगीकारायला हवे. पर्यावरणाचा ढासळता समतोल काही अंशी का असेना कमी करण्यासाठी झाडे लावून ती जगवायला हवीत. मानवाची जंगल संस्कृतीतील जबरी घुसखोरी थांबायला हवी, गैरसमजापोटी लावल्या जाणाऱ्या वणव्यावर समाजप्रबोधन व्हायला हवे तरच मानव व वन्यजीव संघर्ष थांबून वन्यजीव शेतशिवार, गाववस्तीत धाव घेणार नाहीत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
