स्वरधारा संगीत विद्यालयाच्या ‘स्वच्छंदी’ सांगितिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
स्वरधारा संगीत विद्यालयाच्या ‘स्वच्छंदी’ सांगितिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गारगोटीतील स्वरधारा परिवाराच्यावतीने गृहिणी, नोकरदार, उद्योजक – व्यावसायिक महिलांसाठी ‘स्वच्छंदी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिला दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वरधारा संगीत विद्यालयाने वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांसाठी त्यांच्या गायन कलाविष्काराला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज मुक्त मी… अर्थात ‘स्वच्छंदी’ हा कार्यक्रम श्री.शाहू वाचनालयात डॉ.जे.पी.नाईक सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सत्यम शिवम सुंदरा या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सेवा मानून घे आई, केशवा माधवा,अशा भक्तीगीत भावगीतांबरोबर १९८०-९० च्या दरम्यानची गाजलेली हिंदी चित्रपट गीते सुद्धा महिलांनी सादर केली. लता बडबडे यांच्या शिळगीत प्रकाराने कार्यक्रमात गोडवा निर्माण केला. तर ढोलकीच्या तालावर या लावणीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. रुणुझुणुत्या पाखरा, लिंबोणीच्या झाडामागे, शालू हिरवा पाचुनी मडवा, किती सांगू मी सांगू कुणाला, प्रीतीचे झुळझुळ पाणी अशा एकापेक्षा एक मराठी गीतांबरोबर ए मेरे हमसफर,तेरा साथ है तो, तुने वो रंगीले, देखा एक ख्वाब अशी हिंदी चित्रपट गीते सादर करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सागरा प्राण तळमळला या गीताने श्रोत्यांना भारावून टाकले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिलिंद पांगिरेकर, मारुती लाड, श्रीमती शोभना खांडके, सौ.सुलभा ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करुन भारतरत्न लतादीदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला मंगेश सारंग यांनी सिंथेसायजर, विक्रम परीट यांनी तबला- ढोलक- ढोलकी तर ऑक्टो पॅडवर ऋषिकेश गव्हाणकर यांनी साथ दिली. विक्रम परीट यांच्या ढोलकी वादनाला रसिक श्रोत्यांच्या टाळ्यांची दाद मिळाली. सार्थक परुळेकर यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळली. गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, आर.वाय.देसाई, उद्योजक संजय पिसे, एम.एस.पाटील, तानाजी सोनाळकर,सुनील लोहार, श्रीपाद शुक्ल, सुवर्णा दाभोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हरिदास देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सौ.अस्मिता गव्हाणकर यांनी सर्वांचे आभार मानले. राम गव्हाणकर यांनी सूत्रसंचालन केले. सोहम कुलकर्णी,श्रेयस पोवार, सुनील माळी यांच्यासह शाहू वाचनालयाचे सहकार्य लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
