एका असहाय्य कुटुंबाची आर्त हाक… भुदरगड प्राथमिक शिक्षक संवेदना परिवाराचा मदतीचा हात…
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
एका असहाय्य कुटुंबाची आर्त हाक… भुदरगड प्राथमिक शिक्षक संवेदना परिवाराचा मदतीचा हात…

भालेकरवाडीतील अपघातग्रस्त कुटुंबाला संवेदनशील शिक्षकांकडून एक लाख पन्नास हजारांची मदत
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी (सागर मोरे याजकडून)
भालेकरवाडी (ता. भुदरगड) येथे रोटावेटरच्या अपघातात शेतकरी मारुती भालेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर पतीला वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी शोभा सुद्धा मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन परतल्या. या अपघातात शोभा भालेकर यांच्या दोन्ही पायांना इजा होऊन एक पाय काढावा लागला आहे… या अपघाताने भालेकर कुटुंबाचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं… एका असहाय्य झालेल्या या कुटुंबाला माणुसकीची, आर्थिक मदतीची गरज होती. यासाठी भुदरगड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संवेदना परिवाराकडून या कुटुंबाला एक लाख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
दिनांक ६ जून रोजी भुदरगड तालुक्यातील भालेकरवाडी या गावात शेतकरी मारुती भालेकर रोटावेटरने आपल्या शेतात मशागत करत होते. पण अचानक रोटावेटर चा तोल सुटून रोटावेटर मारुती भालेकर यांच्या अंगावर पडला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पतीला वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नीला सुद्धा दोन पायांना इजा झाली. यातील एक पाय कायमचा निकामी झाला. यामुळे त्या कायमच्या अपंग झाल्या आहेत. एकीकडे पतीचा मृत्यू तर दुसरीकडे स्वतःला आलेलं अपंगत्व यामुळे त्यांचा संसार, आशा, भविष्य… सगळं काही थिजून गेलं आहे.
आज त्यांच्या डोळ्यांपुढे तीन निरागस, भुकेली लेकरं….वयोवृद्ध सासू आहेत… शरीर अपंग… घर उद्ध्वस्त… मन तुटलेलं… छत्रं हरवलेल… या स्थितीत त्यांना वैद्यकीय उपचारासाठी, मूलभूत जीवनावश्यक खर्चासाठी आणि त्यांच्या तीन मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. ही बाब ओळखून भुदरगड तालुक्यातील संवेदनशील शिक्षकांकडून या कुटुंबासाठी तीन मुलांच्या नावे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची ठेव पावती भुदरगडचे प्रांताधिकारी हरीश सूळ, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रबोध कांबळे यांच्या हस्ते व सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,शिक्षक यांच्या उपस्थितीत भालेकर कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली.
चौकट: शिक्षकांचे समाजाशी संवेदनशील नातं…
शिक्षकाचे समाजाशी संवेदनशील व हळव्या मनाचे नातं आहे. एक वेगळी नाळ शिक्षक व समाजामध्ये जोडली गेलेली आहे. समाजाशी एकरूप होऊन, मिळून मिसळून काम करणारा, समाजातील सर्व दुःख, संवेदना समजून घेणारा सरकारी नोकर शाहीतील तो एक अविभाज्य घटक आहे. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या कृतिशील विचारातून भुदरगड तालुक्यात काही वर्षांपूर्वी आलेल्या महापुराच्या आपत्तीमध्ये पूरबाधित कुटुंबांना व कोरोना आपत्तीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून या शिक्षक संवेदना परिवाराकडून तब्बल सहा लाखांची मदत केली गेली होती.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





