ज्ञानप्रबोधिनी विशेष : भुदरगड मराठी अध्यापक संघाचा अभ्यास दौरा, माहितीचा खजिना
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ज्ञानप्रबोधिनी विशेष : भुदरगड मराठी अध्यापक संघाचा अभ्यास दौरा, माहितीचा खजिना

– शब्दांकन : सुभाष पाटील (9421721063)
रविवार १३ जुलैची रम्य पहाट… भुदरगड तालुका मराठी अध्यापक संघाचा लोगो असलेली डोक्यावर टोपी व छातीवर बिल्ला परधान करुन मराठीचे शिल्लेदार दौऱ्यासाठी सज्ज होवून एकत्र जमले. सकाळी ७ वा. गारगोटीतील इतिहासाचा मूक साक्षिदार असलेली क्रांती ज्योत व सात क्रांतिकारक हुताम्याना विनम्र अभिवादन करुन अभ्यास दौऱ्याचा आनंदायी प्रवास सुरु झाला. पावसाची थोडी उघडझाप सुरु होती. पाली घाटाचा नागमोडी रस्ता पार करत मिन बस आजऱ्यातील रामतिर्थच्या दिशेने सुसाट सुटली. अजून सकाळची चाहूल संपली नव्हती तो पर्यंत पवित्र रामतिर्थावर आमचे आगमन झाले. कांही तुरळक पर्यटकांनी आमच्या आधिच तेथे हजेरी लावली होती. अजून किरकोळ विक्रेत्यांची दुकानं मुकीच होती. एक विक्रेता मात्र हातात झाडू घेवून स्वच्छतेत मग्न होता. रामतिर्थावरचे पुरातन मंदिरात प्रवेश केला. आत जाताच एका अभुतपुर्व व गुढ अध्यात्माचा अनुभव मन प्रसन्न करुन गेला.हजारो वर्षांची साक्ष देणारा व प्रभूरामचंद्राच्या पदस्पर्शाने पवित्र व पावन झालेला हा परिसर निसर्गाने वेढला होता. सुमारे शंभर मिटर लांबीच्या धबधब्याचे वरुन कोसळणारे व फिसाळणारे पाणी मनाला नाव्हू घालत होते. येथील अध्यात्माचा वारसा सर्वांची साक्ष देत होता.आमचे सहकारी जंगल अभ्यासक दत्ता मोरसे यांनी तेथील विपुल वनसंपदांचा व तिथे आवाज देणाऱ्या दोन-तीन पक्षांची अचूक शास्त्रीय व देशी माहिती दिल्याने ज्ञानात नवी भर पडली…! आजऱ्यात पोहोचताच उपाशी पोटाने हाक दिल्याने नैनिताल हॉटेल मध्ये कुर्मापूरीवर सर्वजन अक्षरशः तुटून पडले..!
तिथून आम्ही ऐतिहासिक नेसरी खिंडींच्या दिशेने निघालो. पण जाता-जाता वाटेत सिरसंगी गाव लागते. येथील विशाल वडाच्या वृक्षाला भेट दिली. तब्बल सव्वा एकर क्षेत्रात विस्तारलेला तो महाकाय वडवृक्ष पाहून मन भारावून तर गेलेच पण आवाढव्या वृक्ष पाहून मन आचंबित देखील झाले. ४०० वर्षाचा साक्षीदार असलेला हा वृक्ष आपले आवाढव्य शरिर घेवून अभिमानाने उभा होता. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपल्या विशाल रुपाने मोहून टाकत होता.तिथे पोहचताच चार-पाच बालचमूंनी आमचे हसत स्वागत केले.हे सगळे बालगोपाल रविवारच्या सुट्टीत वडाच्या पारंब्याने लोबकळत झोका घेत खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते.त्यांनी आमच्याकडे धाव घेत त्या महाकाय वृक्षाची प्रदक्षिणा घडवली.जे पिंडी ते ब्रम्हांडी या भावनेचाच आम्हांला त्या प्रदक्षिणेत अनुभव आला.एका बाजूने वृक्षाच्या कवेत शिरलो.तर वृक्षाचा भला मोठा बुंदा (खोड) डोळ्यात मावत नव्हते.तर त्याच्या हजारो जटारुपी फांद्या जमिनीत घुसून भल्यामोठ्या फांद्यांना आधार देत पहारा करत होत्या तर कित्येक फांद्या लोंबकळत जमिनीला पवित्र स्पर्श करण्यासाठी आसुसलेल्या होत्या.सुमारे २५-३० मिटर रुंदीच्या खोडाच्या भोवताली फेरी घेत साक्षात जटाधारी भगवान शंकराचाच साक्षात्कार झाल्याची अनुभूती आली.तर अजूनही हा वृक्ष आपले हातपाय मातीत घुसून पसरत चालला आहे हे आमच्या सुक्ष्म नजरेतून सुटले नाही. तेवढ्यात आम्हांला पाहून सत्तरी ओलांडलेले दोन-तीन खेडूत जमले.सर्वांनी आम्हांला या वृक्षासंदर्भात माहिती देत देव गोठण हा याचा रखवालदार असल्याची श्रध्दापूर्वक सांगत येथील रुढी-परंपरा व वृक्षाची दंतकथा आजही कशा भक्तीभावाने जपल्या जातात याची माहिती दिली.पुन्हा एकदा त्या महाकाय वृक्षाची विशाल देह डोळ्यात साठवत आणि मनोमन त्याला नमन करुन आम्ही निघोलो.
आता मनाला ओढ लागली होती ती नेसरीच्या ऐतिहासिक पावन खिंडीची सरसर रस्ता कापत आमची बस चालली होती ती नेसरीच्या दिशेनं. कधी एकदा त्या पावन खिंडीत पोहोचतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिल्लेदारांना नमन करतो असे झाले होते. तिथे पोहचताचा भव्य -दिव्य आणि सुंदर अशा स्मारकाने आमचे लक्ष वेधून घेतले. स्वागत कमानीतून आत गेलो तर डाव्या बाजूला छत्रपती शिवरांची भव्य अशी सिंहासनरुढ मूर्ती नजरेस पडली.राजेंचे चरणस्पर्श करुन व मानाचा मुजरा करतांना जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले.तर शेजारीच उंचच्या उंच गगनभेदी विजयी स्तंभ व टोकावर विजयी ज्योतीचे शिल्प उभारल्याचे दिसले. या विजयी स्तंभावर नेसरी खिंडीतील ‘वेडात दौडले मराठे वीर सात’ या रणभूमीचा इतिहास कथन करणारा कोरीव शिलालेख येथे झालेल्या घनघोर लढाईची इतंभूत माहिती देत उभा आहे. तर त्याच्याच समोर या सात हुतांत्म्याचे ऐतिहासिक स्मारक इतिहासाची साक्ष देत उभे आहे. आतमध्ये प्रतिकात्मक अवाढव्य सहा ढाली व भोवताली सुमारे दा किलो वजनाच्या सात तलवारीवर एक ऐतिहासिक ढाल तोलून धरली आहे.तेथे सरसेनापती व सात हुताम्यांना अभिवादन केलेनंतर तेथील पासष्ट वर्षांच्या एका सेवेकऱ्यांने येथील ऐतिहासिक लढाईच आमच्या समोर कथन करत साक्षात उभी केली तर आजूबाजूचे डेहळणी बुरुज व दगडी शिल्पात असलेल्या तत्कालीन स्मारके यांचे दर्शन घडविले.यावेळी सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.आम्ही ‘जय भवानी,जय शिवाजी’ च्या गगनभेदी गर्जना देत सारा परिसर दुमदुमून सोडला.
आता आम्हांला वेध लागले होते चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ल्याचे. तब्बल ६५ कि.मी.चे अंतर पार करावे लागणार होते.बसची चाके त्या दिशेने मार्गक्रमण करु लागली.चंदगड मध्ये पोहचताच यथ्थेच पोटपूजा केली आणि बसने गडाचा नागमोडी रस्ता पकडला. रसत्याच्या दुतर्फा घनदाट झाडीतून जाणारा डांबरी रस्ता एखाद्या अजस्त्र अजगरासारखा भासत होता.अधून मधून धुक्याची पांढरीशुभ्र झिलई डोक्यावरुन वाऱ्यासोबत वाहत जात होती.खिडकीतून डोकावले तर खोलच खोल दऱ्या अंगावर कापरे भरत होत्या.वळणदार रस्त्यावर समोरन येणारे एखाद-दुसरे पर्यटकांचे वाहन अंगावरच आल्याचा भास होत असल्याने काळजाचा ठोका चुकायचा.गडाच्या पायध्याला अरुंद पार्कींगची जागा…गाडीतून उतरताच आमचे स्वागत वरुणराजे केले.धो-धो कोसळणारा पाऊस आणि गडाच्या पायरीवरुन वाहणारा गढूळ प्रवाह पायांचे अंदाज चुकवत होता.एका हातात छत्री आणि शरीराचा तोल सावरत व कसरत करीत गडाची चढण केली.वर पोहचताच दाट धुक्यात पायथ्याला असणारा छोटेखानी गाव पुरता हरवून गेला होता.तर समोरचा विशालकाय पर्वतरांगा धुक्याच्या पांढऱ्याशुभ्र दाट धुक्याच्या चादरीने झाकून गेला होता.आमचे मोबाईल अविस्मरणीय क्षण गोळा करण्यासाठी सरसावले. धुक्याचे लोटच्या लोट त्या डोंगररांवरुन वाऱ्यासोबत अलगद तरंगत चालले होते.निसर्गाचे हे विलोभनीय व विहंगम रुप पाहून आमची संवेदनशील मनं थुईथुई नाचू लागली.कांही क्षणापुरती धुक्याची झिलई हटली आणि सूर्यनारायणाच्या किरणांनी समोरील डोंगर अक्षरशः नाव्हून गेला.निसर्गाचे स्वर्गीय सुख काय असते ते ‘याची देही याची डोळा’ अनुभवले आणि मनाने तृप्तीचा ढेकर दिला.गडावर सुरुवातीलाच भगवान शिवशंभोचे मंदिर असून त्याला लागूनच इतिसासाच्या साक्षीदार असलेल्या एक मोठी व दोन तहान तोफा पर्यटकांचे मन वेधून घेतात.थोडी चढण झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची सदर व एक छोटेखानी खडा पुतळा आहे.त्याच्यापुढे छत्रपतींचे आराध्य दैवत तुळजाभवानीचे दिमाखदार मंदिर आहे.भक्ताच्या स्वागतासाठी भव्य कमानी उभी आहे.तिथेच राजमाता जिजाबाई आणि बालशिवाजी यांचे सुंदर शिल्प उभारले आहे.भवानीचे मंदिर अतिप्राचीन असून दगडात उभारले गेले आहे.आतमध्ये अत्यंत गारवा असून मंदिराच्या सभामंडपात एका बाजूला छत्रपतींच्या स्वराज्यातील मुख्य शिल्लेदार व दुसऱ्या बाजूला साधू-संतांची कोरीव शिल्पे उभारली आहेत.त्यामुळे येथे भक्ती आणि शक्तीचा सुंदर संगम अनुभवता आला.मंदिरातील भवानी देवीची मूर्ती फारच आकर्षक असून पाहताच हात नमस्कारासाठी जोडले जातात हे विशेष.तेथे असलेल्या जोशी पुजाऱ्यांनी पारगड किल्ल्याचा ऐतिहासिक दस्तावेज आपल्या मुखातून उलगडला…’आधि लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ असे उद्गार काढत कोंढाणा किल्ला सर करुन स्वराज्याच्या सामिल करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या लहान मुलाची पारगड ही जहागिरी. मालुसरेंचे १३ वंशच आजही या किल्ल्याचे मालक व भवानीचे सेवक म्हणून आहेत.मालुसरे लढाईत कामी आल्यानंतर त्यांच्या वारसदारांना महाराजांनी ही जहागिरी बहाल केली होती.त्यावेळी महाराजांनी मानाची दिलेली तलवार व कवड्याची माळ आजही मालुसरे घराण्याकडे ऐतिहासिक ठेवा म्हणून जतन केली आहे. दरवर्षी गडावर होणाऱ्या उत्सवाला या वस्तुंची पुजा मालुसरे वारसदारांकडून केली जाते. गडाच्या पश्चिमेला गोव्यापर्यंतचा प्रदेश तर पुर्वेला पार बेळगाव प्रांत नजरेस पडतो.येथील निसर्ग व ऐतिहासिक ठेवा मनाला भावल्यावाचून राहत नाही. गड फिरुन आम्ही उतरणीला लागलो.वाटेत हातच न राखता पर्यटकांना खाऊ घालणारं एक वृध्द दांपत्य टपरीवजा हाँटेल चालवते.तेथे गरमा-गरम कांदा भजी व वाफाळणाऱ्या चहाचा मनमुराद अस्वाद घेत आम्ही उतरणीला लागलो.ज्या चढणीनं आम्ही वर चढलो त्याचीच उतरण करत एक-एक पायरी खाली आलो.येथील निसर्गानं मन अक्षरशः वेढावून गेलं होते.
गाडी पुन्हा परतीचा प्रवास करत असतांना निसर्गाची मुक्तहस्ते केलेली उधळत पुन्हा मोबाईलच्या कँमेरात बंदिस्त करण्यास आम्ही विसरलो नाही. मजल-दरमजल करत गाडी आम्हांला आमच्या कर्मभूमीकडे घेवून चालती झाली.या अभ्यास दौऱ्यासाठी मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष एम.एस.पाटील व सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्याने निसर्ग व इतिहासाचा माहितीचा अनमोल खजिना आम्हांला हाती लागला म्हंटल तर वावगे ठरु नये…!
– शब्दांकन : सुभाष पाटील (9421721063)
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





