वाचनसंस्कृतीचा शालेय पातळीवरचा विकासच अभिजात मराठी भाषेच्या गौरवाला खरा अर्थ देईल : जीवन साळोखे
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
वाचनसंस्कृतीचा शालेय पातळीवरचा विकासच अभिजात मराठी भाषेच्या गौरवाला खरा अर्थ देईल : जीवन साळोखे

आंतरभारती शिक्षण मंडळाच्या उत्तुर, चिमणे, पिंपळगाव शाळेत ग्रंथदान
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शालेय पातळीवर वाचनसंस्कृतीचा अधिक विकास होत राहिला, तरच अभिजात मराठी भाषेच्या गौरवदिनाला खराखुरा अर्थ प्राप्त होईल. त्यासाठी शाळा शाळांतून ग्रंथदान उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वाचते केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी केले.
आंतरभारती शिक्षण मंडळ, उत्तुरच्या उत्तुर विद्यालय व ज्यु.कॉलेज मध्ये अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथदान समारंभात विद्यार्थी – शिक्षकांसमोर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक रविंद्र महापुरे होते.
यावेळी साहित्यिक जीवन साळोखे यांनी आंतरभारती शिक्षण मंडळाच्या उत्तुर विद्यालय उत्तुर, कर्मवीर विद्यालय चिमणे (ता.आजरा), पिंपळगाव विद्यालय पिंपळगाव (ता.भुदरगड) या तीनही हायस्कूलमध्ये स्वतंत्ररीत्या समारंभपूर्वक, आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत, प्रत्येकी तीन हजार रुपये किंमतीचा सोळा पुस्तकांचा संच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाच कादंबऱ्यांचा खंड, ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.रंगनाथन आणि ग्रंथालय शास्त्राच्या पाच तत्वांसह दिनविशेषाची लॅमिनेटेड प्रतिमा भेट दिली.
यावेळी बोलताना प्राचार्य साळोखे यांनी मराठी भाषेला केंद्र सरकारने दिलेल्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल सविस्तर माहिती देवून ते म्हणाले, मराठी भाषा अभिजात भाषा झाली, आता शाळा शाळांतून वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी वाचनाचा जागर वाढला पाहिजे. शिक्षकांसह विद्यार्थी अधिक वाचते झाले पाहिजेत. वाचन, लेखन आणि संशोधनासाठी व्यापक प्रयत्न झाले पाहिजेत. फक्त शोबाज कार्यक्रम आणि जाहीर भाषणांतून फार काही साध्य होणार नाही, हे ओळखून कृतीशील कार्यक्रम राबवला पाहिजे. त्यासाठी ग्रंथदानातून वाचनसंस्कृती अभियान गतिमान होणे आवश्यक आहे.
आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित ग्रामीण भागातील तीनही हायस्कूलमध्ये स्वतंत्ररीत्या झालेल्या कार्यक्रमात साहित्यिक, पत्रकार जीवन साळोखे यांनी ग्रंथदानातून माय मराठीचा खराखुरा गौरव केल्याचे उदगार मुख्याध्यापक रविंद्र महापुरे यांनी काढले. प्रा.संजय खोचारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून ग्रंथदान उपक्रमाचे महत्त्व यावेळी विशद केले.
मुख्याध्यापक इक्बाल मुल्ला, आनंदराव लांबोरे यांनी प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत केले. तर शेवटी एस.एस. प्रभू, एस. एस. आमणगी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास आसावरी जाधव, वाय.ए. भादवणकर, डी.ए. सोनटक्के,एस.एन. पाटील, एकनाथ पाटील, प्रशांत कांबळे इ.सह शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





