दूधगंगा विद्यालयाच्या विशेष उपक्रमांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातली भुरळ
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
दूधगंगा विद्यालयाच्या विशेष उपक्रमांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातली भुरळ
शाळेतील उपक्रमांची अंमलबजावणी अन्य शाळांत करण्यासाठी भर देऊ : जिल्हाधिकारी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांनी ‘कॉफी विथ कलेक्टर’ या विशेष उपक्रमांतर्गत दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल च्या सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सुमारे दीड तास चर्चा केली. याप्रसंगी त्यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यालयातील उपक्रमांची प्रशंसा केली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, “केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल मध्ये राबवले जात असलेले विज्ञान प्रदर्शन, कला शिबिरे, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक जाणीवेचे उपक्रम यामध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रहरी क्लबचे कार्य, विकसित भारत अंतर्गत उपक्रम, कयाकिंग आणि कनोईंग चे प्रशिक्षण, प्लास्टिक मुक्त शाळा अंतर्गत कापडी पिशव्या तयार करणे, लोकसहभागातून सोलर पॅनल, महिलांविषयी जागृतीपर कार्यक्रम इ खरोखरच कौतुकास्पद आहेत. विद्यालयातील सामाजिक उपक्रमांचे इतर शाळांत अंमलबजावणी करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्यासाठी हे उपक्रम पायाभूत ठरतात. यातून नेतृत्व क्षमता, सामूहिक कार्य आणि समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित होते असे त्यांनी नमूद केले.
तुम्ही केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकेच नव्हे, तर चरित्रे, वर्तमानपत्रे आणि विविध साहित्य वाचा. वाचन तुम्हाला जगाची नवी खिडकी उघडून देईल. पण केवळ वाचू नका, त्यावर विचार करण्यास प्रवृत्त करा. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. याचा वापर ज्ञानाचे स्रोत म्हणून करा, केवळ मनोरंजनासाठी नाही. सायबर सुरक्षा आणि नैतिकतेचे भान ठेवावे.
शिक्षकांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.अमोल येडगे यांनी शिक्षकांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. “शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नाहीत, तर ते भविष्याचे शिल्पकार आहेत. बदलत्या काळानुसार नवनवीन शिक्षण पद्धती आत्मसात करणे गरजेचे आहे.” त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधण्याचे आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचे आवाहन केले.
आपल्या मनोगताचा समारोप करताना अमोल येडगे साहेबांनी ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. “प्रशासकीय अधिकारी सामान्य लोकांसाठी, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी सहज उपलब्ध असावेत. त्यांच्या मनात कोणतीही भीती नसावी. हा संवाद त्यांना प्रशासकीय प्रक्रियेची माहिती देतो आणि त्यांना भविष्यात प्रशासनात येण्यासाठी प्रेरित करतो,” असे ते म्हणाले.
याबरोबर त्यांनी संस्थेचे संस्थापक सचिव व ज्येष्ठ पत्रकार अतुल जोशी, संस्थेचे विश्वस्त अमेय जोशी यांचे विशेष कौतुक करताना संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले.
या चर्चासत्रामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांना नाथा चव्हाण, तानाजी पाटील, नेहा कुलकर्णी, मंगल पाटील, राजकुमार माने, संग्रामसिंह यादव, आयेशा जमादार अजित कात्रुट, पुरंदर कांबळे आदीनी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली
जिल्हाधिकारी अमोल येडगे व उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी पुस्तकसंच भेट देऊन चर्चासत्राची सुरुवात केली. यावेळी त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते विद्यालयाच्या ३० वर्षाच्या यशस्वी प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमासाठी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत,उपशिक्षणाधिकारी श्री.अजय पाटील,श्री.हनुमंत बिराजदार, पंचायत समिती कागल च्या गटशिक्षणाधिकारी सौ.सारिका कासोटे ,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.जयश्री जाधव यांचे सहकार्य लाभले .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





