गारगोटी हायस्कूलमध्ये झिम्मा-फुगडी व गौरी गीतांचा रंगला पारंपरिक उत्सव
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूलमध्ये झिम्मा-फुगडी व गौरी गीतांचा रंगला पारंपरिक उत्सव

पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाने लाभली सांस्कृतिक रंगत
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त झिम्मा-फुगडी व पारंपरिक गौरी गीतांचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला विशेष सांस्कृतिक रंगत आणली.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक गौरी गीतांचे सादरीकरण करत झिम्मा-फुगडीच्या माध्यमातून मराठी संस्कृतीतील पारंपरिक लोककलेचा सुंदर आविष्कार सादर केला. यावेळी विद्यार्थिनींनी काठवटकणा, निसरफुगडी, घोडाफुगडी, सूप नाचवणे, घागर घुमवणे, हडवळ घूम पडवळ घूम आदी प्रकार तसेच ‘तेलीन ताई ओ ग माई’, ‘पिंगा’, ‘सासुरवाशिन ग माहेर वाशिन’, ‘रुणझुणत्या पाखरा…’आदी गौरी गीते सादर केली.
विद्यार्थिनींसह सौ.सुनीता पाटील, सौ. रोहिणी निकम, सौ. स्नेहा साळोखे, सौ.एल.आर.पाळेकर, सौ. राजवी साठे, सौ. सुजाता पाटील, श्रेया घोडके, सौ. मंगल कांबळे आदी शिक्षिकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, गौरी गीतांचा स्वर आणि झिम्मा-फुगडीच्या तालावर विद्यार्थिनींचा उत्साह यामुळे विद्यालयाचा परिसर चैतन्यमय झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याबरोबरच आपल्या लोकपरंपरांविषयी अभिमानाची भावना निर्माण झाली.
यावेळी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, निवृत्त मुख्याध्यापक आर. वाय. देसाई, आर. पी. गव्हाणकर, पी. पी. भंडारी, युवराज शिगावकर, प्रा. शेखर देसाई, बी. के. इंगळे, राजेश गिलबिले, धीरज मेंगाणे, विद्याधर परीट, ऋषिकेश गव्हाणकर, शुभम कोकाटे, श्रेया घोडके, विजय स्मार्त, नामदेव शिंदे, विश्वास केणे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमामुळे विद्यालयात परंपरा, संस्कृती आणि लोककलेचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





