शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भीष्माचार्य, बहुआयामी व्यक्तीमत्व : डॉ. सुनीलकुमार लवटे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ज्ञानप्रबोधिनी लाईव्ह विशेष
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भीष्माचार्य, बहुआयामी व्यक्तीमत्व : डॉ. सुनीलकुमार लवटे
– दीपक जगदाळे, क्रिएटिव्ह टीचर्स फोरम, कोल्हापूर
आपल्या आचार, विचार आणि वाणीने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भीष्माचार्य असलेले आदरणीय डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा आज पंचाहत्तरावा वाढदिवस…!
११ एप्रिल १९५० रोजी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा जन्म पंढरपूर येथील वा. बा.नवरंगे या बालकाश्रमात झाला. दोन महिन्यातच आई आश्रम सोडून निघून गेली. आश्रमातील उमाबाईंनी आपली मुलगी ज्योत्स्ना हिच्या बरोबरीने सुनीलकुमार यांचा सांभाळ केला. नऊ वर्षे नवरंगे आश्रमात सरांचे बालपण गेले. तेथून १९५९ साली सरांना कोल्हापूरच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बालगृहात म्हणजे त्यावेळच्या रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत, परिस्थितीशी झगडत इतर मुलांसोबत अगदी अपराधीपणाने सर तेथे राहत होते. नावाचा उल्लेख न होता कैद्यासारखा नंबर घेतला जायचा.
पुढे कोल्हापूरच्या श्री. शाहू दयानंद हायस्कूल मध्ये त्यांचे शिक्षण सुरू झाले आणि तेथे त्यांचे नाव लागले ‘सुनील श्रीपाद लवटे’…! येथेच त्यांना वाचनाची आवड लागली.
सरांचे माध्यमिक शिक्षण आंतरभारती विद्यालय शाहुपुरी कोल्हापूर येथे झाले. आंतरभारतीमध्ये शिकताना ते सानेगुरुजी, वि. स. खांडेकर यांसारख्या लेखकांच्या प्रेमात पडले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते गारगोटी येथील मौनी विद्यापीठात दाखल झाले. ‘डिप्लोमा इन रुरल सर्व्हीसेस’ मध्ये ते ‘रोल ऑफ ऑनर’ ने सन्मानित झाले. याच काळात त्यांच्या सामाजिक कार्याचा वृक्ष वाढत गेला आणि अनेकदा ‘बेस्ट सोशल वर्कर’ हा सन्मान मिळाला.
श्री.मौनी विद्यापीठाच्या परुळेकर ग्रंथालयात मराठी, हिंदी बरोबर इंग्रजी साहित्याचा खजिना त्यांच्या हाती लागला आणि इथेच एक समृध्द शिक्षक घडत गेला. आंतरभारतीच्या पिंपळगाव ता. भुदरगड येथे त्यांनी नोकरीचा श्रीगणेशा केला. नोकरी करत त्यांचे पुढील शिक्षण सुरुच होते. शिवाजी विद्यापीठात हिंदी विषयात एम. ए. पूर्ण करुन ते कोल्हापूरच्या महावीर महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य झाले. हिंदी विषयावर पी. एच. डी. केली आणि ते आपल्या सर्वांना ज्ञात असलेले प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे झाले..!
आजवरच्या ७५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो व्याख्याने दिली. मराठी, हिंदी विषयात विपुल लेखन केले, संशोधनपर निबंध लिहिले.
माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून काम करताना कधी स्वाभिमान सोडला नाही. वेळेच्या बाबतीत तर ते घड्याळालाही मागे टाकत होते. त्यांच्या प्रामाणिक आणि सचोटीच्या कामामुळे वरीष्ठ कार्यालयांतही त्यांच्या नावाचा दबदबा होता. त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन काम करुन देण्याचं धारिष्ट्य कोणी दाखवले नाही. आपल्या कामावर त्यांचा विश्वास होता त्यामुळे ते नेहमी सांगतात की कामातून आपली ओळख निर्माण करा, निडर बना. स्वाभिमान गहाण ठेऊ नका.
आज वयाच्या ७५ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशी त्यांची दिनचर्या आहे. कोल्हापूर मध्ये कोठेही जायचे असेल तर ते मोपेडवरुन जातात. महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांसाठी, व्याख्यानासाठी, परिषदांसाठी ते बसने प्रवास करतात. त्यांचं अखंडित वाचन आणि लेखनही सुरू आहे. वि. स. खांडेकर, गांधीजी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावरच्या अठरा खंडांचे लेखन हा तर त्यांच्या लेखन कारकिर्दीचा कळस आहे.
अनाथ, निराधार, वंचित यांच्या पुनर्वसन कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. रिमांड होमचे बालकल्याण संकुलातील रुपांतर हे लवटे सरांच्या पुढाकाराशिवाय केवळ अशक्य होते. वंचितांच्या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, समाजसेवा या त्रैमासिकाचे संपादन, कारागृह-पोलीस चौकी सुधारणा अशा अनेक बाबतीत ते सक्रिय राहिले.
साहित्यिकांच्या सहवासाने त्यांना साहित्यिक वारसा मिळाला. विशेषतः वि. स. खांडेकर यांच्याशी जुळलेले स्नेहबंध आणि त्यामुळे झालेली त्यांची साहित्यिक जडणघडण अनुकरणीय आहे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वाचन हा त्यांचा नित्यपाठच बनला.
महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे २०१० मध्ये प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर सरांच्या कार्यकक्षा अधिक रुंदावल्या. वाचन, लेखन, संपादन, व्याख्याने, यातून ते विदेशातही पोहोचले. कोणत्या देशात काय चांगले आहे? कशाचे अनुकरण करायला पाहिजे? इथंपासून ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीले.
शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेकांना त्यांनी आपलेसे केले आणि त्यांच्या माध्यमातून स्वतः दोन पावले पुढे होऊन या क्षेत्रात ते कामाचा डोंगर उभा करीत आहेत. त्यांच्या अभ्यासू व विविधांगी व्यक्तिमत्वामुळेच त्यांना साहित्य, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले, मिळत राहतील. यातून मिळालेली सारी धनराशी आणि दरमहा मिळणारी पेन्शन ते आजही स्वतःसाठी खर्च करीत नाहीत. दानशूरपणात लवटे सर कर्णाचा अवतार , साहित्यात कबीराचा तर सामाजिक क्षेत्रात गांधींचा अवतार आहेत असे माझ्या मनाला वाटते. अशा विविधांगी व्यक्तिमत्वाचा नागरी सत्कार कोल्हापूरमध्ये होणे हे कोल्हापूरवासी म्हणून अभिमानास्पद वाटते. रविवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे मा. डॉ सदानंद मोरे, मा. डॉ. दामोदर खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेला हा नागरी सत्कार आम्हाला जवळून पाहता आला हे आमचे केवढे मोठे भाग्य..!
सरांनी अनेक छोट्या मोठ्या संस्था प्रकाशात आणल्या. अनेक संस्थांना पुनर्जीवन दिले. अनेकांना आश्रय दिला. वैयक्तिक मदतीतही ते पुढेच असतात. ते फक्त लढ म्हणणारे गुरू नाहीत तर दोन पावले पुढे होवून मिळेल ते शस्त्र घेऊन स्वतः लढत इतरांना लढण्याची प्रेरणा देणारे गुरू आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात खारीचा वाटा उचलत विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाला दिशा देणाऱ्या ध्येयवेड्या शिक्षकांच्या क्रिएटिव्ह टीचर्स फोरमचा ते अविभाज्य भाग बनले आणि आम्हा साऱ्यांना घेऊन नवनवीन क्रिएटिव्ह संकल्पना प्रत्यक्षात आणत जणू नाविन्याचा ब्रॅंड अंबॅसिडर बनले आहेत. सर स्वप्नं बघून थांबत नाहीत ती सत्यात उतरवतात. सरांच्या या परीस स्पर्शाने आम्ही सारे ध्येयवेडे झालो आहोत. सर नेहमी म्हणतात हा ध्येयवेडेपणा फक्त प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांपुरता मर्यादित न राहता तो महाविद्यालयांपर्यंत पोहोचला पाहिजे. शिक्षकच समाज घडवू शकतो. सरांनी बघितलेले स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. महाविद्यालयांमध्ये कार्यरत आणि निवृत्त प्राचार्य, प्राध्यापक आता ध्येयवेडेपणा करत क्रिएटिव्ह कार्य करण्यासाठी सरसावत आहेत.
कोल्हापूर मध्ये वाचन चळवळ सुरू करुन अत्यंत दिमाखदारपणे सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सवास लागलेला ब्रेक सरांना सतत खुणावत आहे. हा ग्रंथ महोत्सव पुन्हा सुरू करायचा आहे. पुन्हा नव्याने डाव मांडायचा आहे. गरज आहे ती सोशल मीडियात अडकलेल्या डोळ्यांना बाहेर काढत पुस्तकांकडे ओढून नेणाऱ्या विचारांची, वाचन संस्कृती जतन करणाऱ्या हातांची. असा ध्येयवेडेपणा करणारे कोल्हापूरात नक्कीच कमी नाहीत. हा ग्रंथ महोत्सव पुन्हा सुरू होईल या अपेक्षांसह आदरणीय डॉ. सुनीलकुमार लवटेसरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
© दीपक जगदाळे….✒️
क्रिएटिव्ह टीचर्स फोरम, कोल्हापूर
फोन ९८२२५५९२०७

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
