वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी कागल येथे कागल परिसरातील १५ हायस्कूल्स आणि सार्वजनिक वाचनालयांना ग्रंथदान आणि व्याख्यान
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
वाचन प्रेरणा दिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी कागल येथे कागल परिसरातील १५ हायस्कूल्स आणि सार्वजनिक वाचनालयांना ग्रंथदान आणि व्याख्यान

ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचा सलग वीस वर्षे एकहाती उपक्रम सुरूच…!
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
वाचन प्रेरणा दिना निमित्त ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार जीवन साळोखे हे आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत, कागल शहर आणि परिसरातील पंधरा हायस्कूल्स सार्वजनिक वाचनालयांना प्रत्येकी दर्जेदार पुस्तकांचा संच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाच कादंबऱ्यांचा खंड, ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांची आणि ग्रंथालय शास्त्राची पाच तत्वे, मराठी भाषेचे विशेष दिन यांची लॅमिनेटेड प्रतिमा भेट म्हणून देणार आहेत. अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक, दुधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी दिली.
देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती, जगप्रसिद्ध संशोधक, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, वाचन प्रेरणा दिन म्हणून देशभरात दरवर्षी साजरा केला जातो. डॉ.कलाम हे वाचनप्रेमी आणि ग्रंथप्रेमी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते.त्याचाच एक भाग म्हणून, निवृत्त प्राचार्य जीवन साळोखे हे दरवर्षी हा “वाचन प्रेरणा दिन” ग्रंथदानातून एकहाती साजरा करतात.
गेली वीस वर्षे सातत्याने संपूर्ण जिल्ह्यातील शाळा शाळांतून ग्रंथदान हा एकहाती उपक्रम, स्वखर्चाने जीवन साळोखे हे प्रत्यक्ष जाऊन राबवत आहेत. शिक्षकांसह विद्यार्थी वाचते व्हावेत, शालेय ग्रंथालये समृद्ध व्हावीत आणि समाजामध्ये वाचन प्रोत्साहनातून, वाचनसंस्कृती विस्तारण्यासाठी वाचन चळवळ गतिमान व्हावी, या व्यापक हेतूने ते अथकपणे प्रयत्नशील आहेत. गेल्या वीस वर्षांत सुमारे १८ हजार दर्जेदार पुस्तके भेट म्हणून त्यांनी दिलेली आहेत. तसेच थोरांचे चरीत्र ग्रंथ, मराठी भाषेतील “संपूर्ण भारतीय संविधान” म.गांधीजींचे “माझी आत्मकथा”, जिल्ह्यातील शंभर मराठी विषय शिक्षकांना किशोर मासिकाची वार्षिक वर्गणी भेट, शाळांना साधना दिवाळी अंक भेट इ. अनेक उपक्रम वाचनसंस्कृती वाढीसाठी सातत्याने करत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून, बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी, ते कागल शहर व परिसरातील हायस्कूल्स व सार्वजनिक वाचनालयांना एकत्र करून, वाचनसंस्कृतीचा जागर शिक्षक , मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांसमवेत करणार आहेत, अशी माहिती दुधगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक बुगडे यांनी दिली. बुधवारी १५ रोजी सकाळी ११.३० वा. मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत दुधगंगा विद्यालय, (धरणग्रस्त वसाहत) येथे होत असून, ग्रंथप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





