वाचनाच्या उपेक्षेने फक्त लोकसंख्या वाढली, माणसांची संख्या घटली : मधुआप्पा देसाई
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
वाचनाच्या उपेक्षेने फक्त लोकसंख्या वाढली, माणसांची संख्या घटली : मधुआप्पा देसाई
साहित्यिक जीवन साळोखे यांचेकडून विविध महाविद्यालयांना पाचशेहून अधिक ग्रंथभेट
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी गारगोटी
वाचनाची घोर उपेक्षा केल्यानेच समाजात आजच्या काळात लोकसंख्या वाढूनही, माणसांची संख्या कमी होत आहे.परिणामी संवेदनशीलता आणि सभ्य भाषा लोप पावत आहे. एक कृतीशील विचार हा शंभर भाषणांपेक्षा नेहमीच प्रभावी असतो. साहित्यिक जीवन साळोखे यांचे ग्रंथदानातून वाचनसंस्कृती वाढवण्याचे काम सर्वांना दिशादर्शक आणि प्रेरणादायक आहे. असे प्रतिपादन श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा) यांनी केले.
ते शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेतील अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत, येथील कर्मवीर हिरे काॅलेजमध्ये आयोजित कार्यशाळेत, जीवन साळोखे यांच्या “ग्रंथदान उपक्रमांतर्गत ” ग्रंथभेट समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी राजर्षी शाहूंच्या विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य डाॅ.जे. के. पवार, ग.गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा चे प्राचार्य डाॅ. टी एम पाटील, डाॅ.अतुल नगरकर,डाॅ. अरविंद चौगले, बाजीराव चव्हाण इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे म्हणाले, ” वाचनातूनच व्यक्तिमत्व विकास आणि सुजाण नागरिक होवू शकतो. वाचनाच्या घोर उपेक्षेमुळे सर्व क्षेत्रात प्रदुषण वाढत आहे. वाचन प्रोत्साहन आणि समृद्ध शालेय ग्रंथालयासाठी ग्रंथदान हा उपक्रम एक शैक्षणिक व सामाजिक चळवळ झाला पाहिजे.”
राजर्षी शाहूंच्या विचारांचे अभ्यासक प्राचार्य डाॅ.जे.के. पवार म्हणाले,” वाचन प्रोत्साहन आणि वाचनसंस्कृती समृद्ध होण्यास आपल्या संस्थान काळात शाहूमहाराजांनी शाळाशाळांना ग्रंथभेट देवून या चळवळीचा पाया घातला होता. जीवन साळोखे हे तोच वारसा सक्षमपणे आज चालवत आहेत.”
ग.गो.जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.टी एम पाटील यांनी यावेळी वाचन संस्कृती आणि समृद्ध ग्रंथालयाचे महत्त्व विशद केले. संयोजक प्राचार्य डाॅ.उदय शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक प्रा.डांगे यांनी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी सहभागी महाविद्यालये आणि वाचनालयांना साहित्यिक जीवन साळोखे यांचेकडून प्रत्येकी बत्तीस दर्जेदार,उपयुक्त पुस्तकांचे संच मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात डाॅ.अतुल नगरकर यांनी बदलत्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानाचा यथोचित वापर करून वाचन संस्कृती वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले. आभार ग्रंथपाल प्रा. शैलेश देसाई यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.विनया रायजाधव यांनी केले. कर्मवीर हिरे काॅलेजच्या ग्रंथालय विभागाने या कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
