मेन राजाराम कॉलेजच्या प्राची लाखे हिने पेट्रोल पंपावर काम करत इ.१२ वी परीक्षेत मिळवले ७५ टक्के गुण : प्रथम क्रमांकाची मानकरी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मेन राजाराम कॉलेजच्या प्राची लाखे हिने पेट्रोल पंपावर काम करत इ.१२ वी परीक्षेत मिळवले ७५ टक्के गुण : प्रथम क्रमांकाची मानकरी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
मेन राजाराम कॉलेज मधील कला शाखेची विद्यार्थिनी प्राची मनोहर लाखे पेट्रोल पंपावर काम करत इ.१२वी बोर्ड परीक्षेत ७५.०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
जन्माअगोदर पितृछत्र हरवलेली प्राची आईच्या छायेखाली वाढत असताना आई परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी चार घरचं धुणीभांडी करून कसतरी संसाराचा गाडा चालवत होती. प्राचीला आईचे कष्ट पाहून वाटायचं की आपणही आईला मदत करावी पण शिकण्याची प्रचंड आवड असल्याने तिने सकाळच्या प्रहरी काॅलेज असावे व सकाळी ११ ते ६ पर्यत पेट्रोल पंपावर काम करण्यासाठी तिने गोखले काॅलेज व मेन राजाराम कॉलेज या दोन काॅलेज मधील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम काॅलेज ला (भवानी मंडप) प्राधान्य दिले. नित्यनेमाने ती काॅलेजला यायची, काॅलेजचे प्राचार्य डॉ गजानन खाडे, वर्गशिक्षक प्रा बी टी यादव, प्रा सुषमा पाटील, प्रा बी पी माळवे, प्रा राहूल देशमुख, प्रा सचिन वडाम तसेच सर्व शिक्षकांनी तिला योग्य ती मदत मार्गदर्शन केले.
आजही प्राची उद्यमनगर च्या पेट्रोल पंपावर काम करत आहे. वेळोवेळी तिला शैक्षणिक, आर्थिक मदत पाटील मॅडम करतात. परिस्थितीची तिला जाणीव असल्याने मिळेल त्या वेळी तिने परिस्थिती चे अवडंबर न माजता अभ्यास केला. आजही ती उद्यमनगर च्या पेट्रोल पंपावर काम करून घरी विणकाम, भरतकाम करून ते साहित्य बाजारात विकून आईला सहकार्य करत आहे.
……….
मेन राजारामच्या निकालाची वैभवशाली परंपरा कायम
येथील ग्रामीण व शहरी संस्कृतीचा मिलाफ साधत १७३ वर्षाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने बारावीच्या निकालाची गुणवत्तापूर्ण वैभवशाली परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे.
बारावी परीक्षेत विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० % तर कला शाखेचा ९५.७१ % उच्चांकी निकाल प्राप्त करून मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजने गरुडभरारी घेतली आहे. गुणवत्तापूर्ण व उच्चांकी निकाल असा वैभवशाली इतिहास आसणाऱ्या या काॅलेजमध्ये विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु. देसाई सानिया ईम्रान ७२.५० %, द्वितीय क्रमांक कु.पोवार ओंकार कृष्णात ७१.६७ %, व तृतीय क्रमांक कु. सनदे आलिशा मिरासाब ७०.८३% गुण प्राप्त करत मिळवला आहे तर कला शाखेतून प्रथम क्रमांक कु. लाखे प्राची मनोहर ७५.३३ %, द्वितीय क्रमांक कु. राऊत ऐश्वर्यालक्ष्मी नरेंद्र ७३.५० % व तृतीय क्रमांक कु. हुल्ले श्रुतिका संजय ६३.३३ % व वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु. आंबी गायत्री सतिश ८४.३३%, द्वितीय क्रमांक कु. कांबळे आरती अजित ८३.५० %, व तृतीय क्रमांक कु. जाधव सानिका राजाराम ७९.१६ % गुण प्राप्त करत मिळवला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, विज्ञान वर्गशिक्षक प्रा.एच. एम.काटकर, कला वर्गशिक्षक प्रा. बी.टी.यादव, वाणिज्य वर्गशिक्षक प्रा.राहूल देशमुख तसेच सर्व विषय शिक्षक-शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कार्तिकेयन एस., शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर, प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी केले. प्रशालेने आपल्या गुणवत्तापूर्ण निकालाने व कर्तृत्वाने कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक कार्यक्षेत्रात आपली स्वतःची मोहोर उमटविली आहे.
गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर आधुनिकता व टेक्नॉलॉजीचा समृद्ध परंपरा जोपासत प्रशाला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी यावेळी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
