चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गारगोटी हायस्कूलने राबविला ‘’मातीचे बैल निर्मिती’ उपक्रम : बेंदूर सणानिमित्त मातीतून साकारले संस्कार
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गारगोटी हायस्कूलने राबविला ‘’मातीचे बैल निर्मिती’ उपक्रम : बेंदूर सणानिमित्त मातीतून साकारले संस्कार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध लोकपरंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने, भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने बेंदूर सणाचे औचित्य साधून प्रत्यक्ष मातीचे बैल निर्मिती हा अभिनव उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. “मातीतून साकारले संस्कार, विद्यार्थ्यांचा सर्जनशील आविष्कार” या संकल्पनेवर आधारित आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय कौशल्याने आणि उत्साहाने निसर्गरम्य माती मळून, तिला हस्तकौशल्याच्या सहाय्याने सुंदर आकार दिला. स्वतःच्या हातांनी मातीपासून सुंदर बैल तयार करून त्यांना शिंगे, कान व शरीराचे अवयव जोडून उत्कृष्ट कलाकृती साकारल्या. आपल्या ग्रामीण संस्कृतीचा, शेतकरी जीवनाचा आणि बैलांचे महत्त्व याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. मोबाईल आणि स्क्रीनच्या जगातून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी मातीशी नाते जोडले, कल्पकतेला वाव दिला आणि आपल्या परंपरेचा अभिमान अनुभवला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, हस्तकौशल्य, संयम, सहकार्याची भावना आणि आपल्या संस्कृतीविषयी आदर निर्माण झाला. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा हा आनंददायी अनुभव विद्यार्थ्यासाठी संस्मरणीय ठरला. सदरचा उपक्रम शाळेचे प्राचार्य श्री. मिलिंद पांगिरेकर यांच्या प्रेरणेने श्री. एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मातीकामाचे तंत्र आणि सुबक आकार देण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय परंपरा, संस्कृती आणि सणांचे महत्त्व समजावे, तसेच पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची सवय रुजावी यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी तयार केलेले मातीचे बैल हातात धरून आपल्या आनंदाचा आणि कलेचा आविष्कार घडवला. शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे पालक वर्ग, शिक्षक आणि नागरिकांमधून कौतुक होत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





