आता शिक्षकांच्या कामावर व्हॉट्सॲपवरून ‘नजर’! शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात ‘विषय समित्या’ स्थापन होणार
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
आता शिक्षकांच्या कामावर व्हॉट्सॲपवरून ‘नजर’! शिक्षण विभागाचा धडाकेबाज निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात ‘विषय समित्या’ स्थापन होणार

राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी मोठा निर्णय
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. आता जिल्हा स्तरावर विषयनिहाय शिक्षकांच्या विशेष ‘विषय समित्या’ स्थापन करण्याचा थेट आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला आहे.
शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप अशा समित्या स्थापन झालेल्या नाहीत, तेथे त्या तात्काळ स्थापन करण्याचे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
‘परख’ (PARAKH) सर्व्हेक्षणानुसार इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी या नव्याने स्थापन होणाऱ्या विषय समित्यांनी विशेष आणि ठोस प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर स्थापन करण्यात आलेल्या सर्व विषय समित्यांचा कामाचा अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
कामात तत्परता आणि सुसूत्रता यावी यासाठी प्रत्येक विषय समितीचा एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जाणार आहे. या ग्रुपमध्ये संबंधित अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि विषय समितीचे सदस्य सहभागी असतील. जिल्हास्तरासोबतच राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुपही तयार केला जाणार असून, यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयातील उत्कृष्ट, निवडक आणि नवोपक्रमशील पाच शिक्षकांचा समावेश केला जाईल.
या समित्यांमध्ये कृतिशील, नवोपक्रमशील आणि समर्पित शिक्षकांचा समावेश करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या विषय समित्यांमार्फत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, अध्ययनस्तर चाचण्यांचे नियोजन करणे, अध्यापन साहित्य व शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे.
या सर्व विषयांच्या स्थापन होणार समित्या
माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांच्या समित्या स्थापन केल्या जातील. तर उच्च माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इतिहास, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, अर्थशास्त्र तसेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयांच्या समित्या स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आणि शिक्षकांना थेट तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रशासनाशी कनेक्ट करण्यासाठी शिक्षण संचालकांचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा आणि मैलाचा दगड मानला जात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात शालेय गुणवत्तेत मोठी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





