‘सभ्य भाषा – सभ्य वर्तन अभियाना’चा शुभारंभ भुदरगड तालुक्यामधून
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
‘सभ्य भाषा – सभ्य वर्तन अभियाना’चा शुभारंभ भुदरगड तालुक्यामधून
अभियान लोक चळवळ स्वरुपात राबविणार : डॉ.अर्जुन कुंभार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
‘सभ्य भाषा – सभ्य वर्तन अभियाना’चा शुभारंभ भुदरगड तालुक्यामधून करण्यात आला असून शाश्वत विकास चळवळीने हे अभियान लोक चळवळ स्वरूपात राबवण्याचे ठरविले असल्याचे शाश्वत विकास चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अर्जुन कुंभार यांनी सांगितले.
श्री.मौनी विद्यापीठ संचलित श्री.शाहू कुमार भवन प्रशालेत ‘सभ्य भाषा – सभ्य वर्तन अभियाना’चे उद्घाटन प्राचार्य डॉ.जयंत कळके यांच्या हस्ते व श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा), शाश्वत विकास चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अर्जुन कुंभार, गटशिक्षणाधिकारी श्री.दीपक मेंगाणे, चळवळीचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शशिकांत चव्हाण, जावडेकर बीएड महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.प्रतिभा देसाई, प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ.एस.बी. शिंदे, श्री.वजीर मकानदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना उद्घाटन समारंभाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अर्जुन कुंभार यांनी २१ व्या शतकातील बदलती परिस्थिती त्यासाठी लागणाऱ्या अद्ययावत माहिती, ज्ञान आणि कौशल्य युक्त युवकांची गरज असल्याचे सांगून, आपले युवक हे डीजे, वाढदिवस, धबधबा पर्यटन अशा गोष्टीत हरवले असून त्यांच्याकडून असभ्य भाषा व असभ्य वर्तन मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. ही परिस्थिती चिंताजनक असून सर्व पालक, शिक्षक आणि समाज चिंतित आहे. हे समाजाचे भविष्य चिंताजनक असल्याचे लक्षण आहे. यासाठी शाश्वत विकास चळवळीने हे अभियान विकसित केले असून त्याची शाळा महाविद्यालयामध्ये अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासंबंधीचा सात कलमी कृती कार्यक्रम मुख्याध्यापकांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्याचबरोबर या निमित्ताने झालेल्या प्राथमिक बैठकांमध्ये आणि मुख्याध्यापकांच्या उद्बोधन शिबिरामध्ये व समाज माध्यमातून या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येने सर्वच जण त्रस्त असून यावर कोणत्याही स्तरावर गांभीर्याने उपाययोजना होताना दिसत नाही म्हणून, शाश्वत विकास चळवळीने हे अभियान लोक चळवळ स्वरूपात राबवण्याचे ठरविले. एका बाजूला शिक्षण क्षेत्रातून आणि दुसऱ्या बाजूला समाज व युवकातून याचा प्रचार प्रसार केला जाणार आहे असे डॉ.कुंभार यांनी सांगून गटशिक्षणाधिकारी श्री.दीपक मेंगाणे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी हे अभियान राबवण्यामध्ये घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.
डॉ.जयंत कळके यांनी हे अभियान अतिशय उपयुक्त आणि गरजेचे असून अशा परिस्थितीत किशोरवयीन विद्यार्थी आणि युवकांच्यावर संस्कार करण्याची योजना शाश्वत विकास चळवळीने विकसित केल्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांनी श्री.मौनी विद्यापीठाकडून या अभियानासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
गटशिक्षणाधिकारी श्री.दीपक मेंगाणे यांनी या अभियानाची गरज व महत्त्व सांगून, भुदरगड तालुक्यात या अभियानाची आजपासून सक्षम अंमलबजावणी केली जाईल याबाबत सर्वांना अश्वस्थ केले. त्यांनी शाश्वत विकास चळवळीच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याला सदिच्छा दिल्या.
यावेळी अभियानाचा मसुदा सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ.शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. डॉ.शिंदे यांनी हे अभियान श्री.शाहू कुमार भवन प्रशालेमध्ये अतिशय सक्षमपणे राबविण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांना सभ्य भाषा व सभ्यवर्तनाची शपथ देण्यात आली, त्यासंबंधीच्या घोषणा देण्यात आल्या व चिंतनाचे वाचन करण्यात आले.
या उद्घाटन समारंभासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व सुमारे ७०० विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास एस.पी.पाटील, बळवंत रसाळ, वृक्षमित्र प्रा.आर के पाटील, मुरगुडचे जयवंत हावळ, एस टी सामंत, सुरेश खोत, प्रा.मुल्ला, टी.बी.पाटील, बी.जी.देवळी, डी. एस.देसाई, पी.एस.कांबळे, राजू यादव हे शाश्वत विकास चळवळीचे सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ.एस.बी.शिंदे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक बी.डी.मांडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ.निशा जाधव यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





