*खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या विरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आ.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : ५० हून अधिक संघटनांचा मोर्चात सहभाग*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या विरोधात शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आ.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : ५० हून अधिक संघटनांचा मोर्चात सहभाग*

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
खाजगीकरण व कंत्राटीकरण, विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामांचा भडीमार करून मुख्याध्यापक, शिक्षक आदीना अध्यापन प्रक्रियेपासून दूर ठेवणे, जुनी पेन्शन योजना न लागू करणे या सारख्या अनेक मागण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने निर्णयात बदल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सकाळच्या सत्रात शाळेचे कामकाज आटोपून या मोर्चात हजारोंच्या संख्येने शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते.
शाळा वाचवा – शिक्षण वाचवा, खाजगीकरण रद्द झाले पाहिजे, कंत्राटीकरण रद्द झाले पाहिजे, शिक्षण आमच्या हक्काचे – नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी सरकारी शाळा वाचविण्यासाठी एकीची वज्रमूठ उगारली.
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा कार्पोरेट कंपन्यांना शाळा दत्तक योजना या तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मोठ्या देणगीदारांची नावे शाळेला देण्यात येणार आहेत. सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचाही निर्णय घेतला आहे. या विरोधात विविध शिक्षक संघटना, पालक संघटना, कर्मचारी व नागरिकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
टाऊन हॉल येथून मोर्चास सुरुवात झाली. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा झाला. आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शिक्षण वाचवा – शाळा वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. अशा आशयाचे फलक हाती घेऊन हजारो जणांनी संघटितपणे सरकारच्या निर्णयाला विरोध केला. हात उंचावून सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात नारा दिला. तसेच सरकारी शाळा वाचवण्यासाठी लढण्याचा निर्धार केला.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राजाराम वरुटे, भरत रसाळे, राजेंद्र कोरे, संतोष आयरे यांची भाषणे झाली. साऱ्याच वक्त्यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला. शाळांचे खाजगीकरण आणि नोकर भरतीचे कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही दिला. उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, मनसेचे पुंडलिकराव जाधव यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
या आंदोलनाला मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने ही पाठिंबा दिला. संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, अंकुश रानमाळे सुरेश पानारी आदींनी मोर्चात सहभागी झाले. श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी.जी.बोराडे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, कृती समितीचे बाबासाहेब पाटील, सी.एम.गायकवाड, दत्ता पाटील, आर डी पाटील, उदय पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनील एडके ,कोजिमाशीचे चेअरमन बाळ डेळेकर, खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे शिवाजी भोसले आदी आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक अशा ५० हून अधिक संघटनांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये शिक्षक संघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष बी.एस.पाटील, शिक्षक संघ थोरात गटाचे राज्य संपर्क प्रमुख एस. व्ही. पाटील, जिल्हाध्यक्ष रवी पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर ,जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संजय पाटील, कोल्हापूर जिल्हा गृहतारण संस्थेचे सुरेश कांबळे, शिक्षक नामदेव पाटील, संदीप पाटील, सुधाकर निर्मळे, सर्जेराव सुतार, मनोज मालवडकर आदींचा सहभाग होता.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





