यु डाएस प्लसची ऑनलाईन माहिती न भरलेल्या शाळांचे स्थगित केलेले वेतन त्वरित आदा करण्याची मुख्याध्यापक संघाची शिष्टमंडळाद्वारे मागणी : शिक्षणाधिकारी (माध्य) यांच्याकडून मागणी तत्वतः मान्य
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
यु डाएस प्लसची ऑनलाईन माहिती न भरलेल्या शाळांचे स्थगित केलेले वेतन त्वरित आदा करण्याची मुख्याध्यापक संघाची शिष्टमंडळाद्वारे मागणी : शिक्षणाधिकारी (माध्य) यांच्याकडून मागणी तत्वतः मान्य 
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील यु डाएस प्लसची ऑनलाईन माहिती न भरलेल्या माध्यमिक शाळांना या संदर्भात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करावे व स्थगित केलेल्या शाळांचे वेतन त्वरित आदा करावे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिष्टमंडळाद्वारे शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. एकनाथ आंबोकर यांच्याकडे करण्यात आली. (माध्य) यांनी सदरची मागणी तत्वतः मान्य केली असून माहिती तात्काळ भरावी असे आवाहन केले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जिल्ह्यातील यु डाएस प्लस ऑनलाईन माहिती न भरलेल्या सुमारे २१७ शाळांचे माहे नोव्हेंबर २०२३ चे वेतन स्थगित ठेवले आहे. संबंधीत शाळांनी सदरची माहिती का भरली नाही? त्यांच्या काय समस्या आहेत ? त्यांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? याची शहानिशा किंवा त्यांना आलेल्या समस्या व त्यांचे निराकरण पर्यवेक्षीय यंत्रणेकडून न करता केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये या शाळांचे वेतन स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्ह्यातील शाळांवर अन्याय करणारा आहे.
यु डाएस प्लस माहिती भरताना शाळांना अडचणी येत असून शिक्षण विभागाने माहिती भरण्याबाबत शाळेतील मुख्याध्यापक अथवा लिपिकांचे प्रशिक्षण अथवा कार्यशाळा घेतलेली नाही, परराज्यातील प्रवेशित विद्यार्थी यांची इम्पोर्ट प्रक्रिया कोणत्या कारणाने होत नाही हे कार्यालयाने जाणून घेतलेली नाही, विद्यार्थी एक्सपोर्ट व इम्पोर्ट करण्याबाबत शाळांना कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेतलेले नाही, विद्यार्थी आधार अपडेशन करताना मूळ शाळेतून आलेल्या विद्यार्थ्याची जन्मतारीख व आधार क्रमांक चुकीचा नोंदवल्याने त्याचा पेन नंबर दाखल शाळेला मिळत नाही, आर. टी. ई. नुसार वयानुरूप विद्यार्थ्याला शाळेत दाखल करणे बंधनकारक असताना अशा विद्यार्थ्यास सरल प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी टॅब उपलब्ध नाही. हा टॅब फक्त गटशिक्षणाधिकारी लॉगिनवर आहे. तो वेळेत उपलब्ध करून दिला जात नाही.
अशा बऱ्याच समस्यांना शाळांना विद्यार्थी अपडेशन करताना अडचणी येत आहेत. वरील समस्येमुळे सरल व यु डायस प्लसचा डाटा संख्यात्मकरित्या जुळत नाही. ही तफावत ग्राह्य धरून आपण वेतन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक या गोष्टीचा व वेतनाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे शाळांना येणाऱ्या समस्येचे निराकरण करावे व स्थगित केलेल्या शाळांचे वेतन त्वरित आदा करावे अशी मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघांचे चेअरमन सुरेश संकपाळ, व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, व्हा.चेअरमन रविंद्र मोरे, सहसचिव अजित रणदिवे, लोकल ऑडीटर इरफान अन्सारी, संचालक श्रीकांत पाटील, जितेंद्र म्हैशाळे, सागर कुमार चुडाप्पा आदी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





