नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घेऊया सापांविषयी आपल्याकडे प्रचलित असलेले समज – गैरसमज – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घेऊया सापांविषयी आपल्याकडे प्रचलित असलेले समज – गैरसमज

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्ञानप्रबोधिनी विशेष : नागपंचमी

नागपंचमीच्या निमित्ताने जाणून घेऊया सापांविषयी आपल्याकडे प्रचलित असलेले समज – गैरसमज

टिम वर्ल्ड फॉर नेचर

      आसपास साधा साप दिसला की तो मारायचा, हेच सर्वसामान्य लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे…..साप म्हणजे आपला शत्रू हीच शिकवण पिढ्यानपीढ्या मिळाली आहे….साप ही जमात मानवी अप्रचाराने बदनाम झाली आहे… विषारी साप कुठला आणि बिनविषारी कुठला? हे ओळखता न आल्याने माणूस घाबरतो….त्याच्या या अज्ञानातूनच साप मारले जातात….सापांच्या जाती ओळखता न आल्याने सुद्धा अनेक जणांचा जीव जातो.
       साप म्हटलं की त्या पाठोपाठ येते भीती आणि अंधश्रद्धा. या कारणांमुळेच साप दिसला की ठेचला जातो. असे हजारो साप भारतात रोज मारले जातात. हे पाहून असं वाटतं की आपण आपल्याच पायावर कुर्‍हाड मारायचे काम करतो.
       साप चावला की मांत्रिकाकडे जायचे, हे आजही बहुतांशी खेडोपाड्यात लोकांच्या मनावर ठसवले गेले आहे. बर्‍याचदा साप बिनविषारी असतो. मग तातडीने मांत्रिकाकडे धाव घेतल्यानेच आपला जीव वाचला अशी समजूत होते व त्यामुळे लोकांचा मांत्रिकावरचा विश्वास वाढतो.सापावर पाय पडला किंवा त्याला त्रास झाला तरच तो चावतो. आपला पाय स्थिर असला, तर तो पायावरून जाईल पण चावणार नाही. मुळात दंश करणे हा सापाचा गुणधर्म नाही ते त्याचे स्वसंरक्षण आहे. त्याबद्दल अनेक दंतकथा आहेत. या अशा कथांमुळे लोकांच्या गैरसमजुती अधिक अधिक दृढ होत गेल्या आहेत.
    “जोपर्यंत तुम्ही एखाद्या प्राण्याला दुखवत नाही किंवा मारण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तो प्राणी तुमच्यावर हल्ला करीत नाही.” त्याला साप सुद्धा अपवाद नाही. मात्र या जीवसृष्टीत माणूस हा एकमेव प्राणी आहे, जो विनाकारण स्वतः बरोबर इतरांनाही त्रास देतो आणि स्वतःवर नको ती संकटं ओढवून घेतो.

सर्प : समज व गैरसमज
       सापाबाबत बर्‍याचशा अंधश्रद्धा या ऐकीव, पुरातन काळापासून चालत आलेल्या तसेच प्रसारमाध्यम, चित्रपट यातूनच जास्त पसरल्या आहेत. खरे तर अत्यंत शांत, खाणे-पिणे व झोप काढणे एवढंच माहीत असलेला साप आपण मोठ्या प्रमाणात बदनाम केला आहे. लक्षात ठेवणे, स्मरणात राहणे या गोष्टी सापाकडे बिलकुल नाहीत. त्यामुळे बदला घेणे हा प्रकार सापाच्या बाबतीत घडत नाही. मात्र चित्रपटांमुळे या अफवांचा जास्त प्रसार झाला आहे. शाळा, कॉलेज, खेड्यांमध्ये प्रसार करताना आलेले काही प्रश्न, समस्या, त्या त्या भागातल्या अंधश्रद्धा पाहू.

१) साप डूक धरतो का?
    सापाचा मेंदू विकसित झालेला नाही. त्यामुळे साप डूक धरणे व बदला घेणे. ही गोष्ट अशास्त्रीय आहे. भूक लागली असता भक्ष्य पकडणे, तहान लागल्यावर पाणी पिणे आणि झोपा काढणे या पलिकडे साप विचार करू शकत नाही. त्यामुळे त्रास देणारी व्यक्ती लक्षात ठेवू शकत नाही म्हणजेच साप डूक धरत नाही.

२) सर्पविषावर मंत्रोपचार चालतो का.?
सर्पदंश झाल्यावर सर्पप्रतिबंधक इंजेक्शन (ASV) दिल्यानेच रुग्ण बरा होऊ शकतो. विषारी साप चावला असता कोणतेही मंत्रतंत्र, जडीबुटीचे औषध, अंगारे-धुपारे, भस्म आयुर्वेदिक व तत्सम औषधे यांचा उपयोग होत नाही.

३) रातराणी या वनस्पतीमुळे साप येतात का?
रातराणी फुलांच्या सुगंधामुळे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्यांना खाण्यासाठी बेडूक, पाल, सरडे येतात. यांना खाण्यासाठी साप त्या ठिकाणी येतात.

४) सर्पदंश होऊ नये म्हणून रात्री शेतकरी काठी आपटत चालतात ते का?

काठी आपटल्याने उत्पन्न होणार्‍या ध्वनीलहरींची संवेदना सापांना जाणवते. ही संवेदना सुमारे ५० फूट अंतरावरून सापांना जाणवते. त्यामुळे वाटेत असलेला साप बाजूला निघून जाऊ शकतो. त्यामुळे आडवाटेत साप येणे किंवा सापावर पाय पडणे अशा घटना टाळू शकतो.

५) मेलेल्या सापावर रॉकेल टाकले असता तो पुन्हा जिवंत होतो का?
नुकत्याच मारलेल्या सापावर जर रॉकेल टाकले तर जखमेस प्रचंड वेदना होतात. त्यामुळे साप वळवळू लागतो. परंतु ही हालचाल काही क्षणापुरती असते. साप जिवंत होत नाही.

६) साप दूध पितो का?
साप हा सस्तन प्राणी नाही. तो दूध पीत नाही..
सर्व साप हे मांसाहारी आहेत. उंदीर, घुशी, बेडूक, सरडे, पाली, छोटे पक्षी आदी सापाचे अन्न आहे. साप दूध पित नाही. सापाला दूध पाजल्यास सापांच्या अन्ननलिका, श्वसनसंस्थेतील अवयवांवर परिणाम होऊन सापांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
दूध हे सापांना विषासारखे आहे. गारुडी लोक सापाला अनेक दिवस तहानलेला ठेवतात, समोर दुधाची वाटी ठेवली असता, तो पाणी समजून पितो.

७) नागमणी असतो हे खरे आहे का.?
कोणत्याही नागाच्या डोक्यावर नागमणी नसतो. गारुडी नागमणी म्हणून जे दाखवतात तो काचेचा, बेंजीनचा खडा असतो.

८) मुंगूस जखमी झाल्यास ते विशिष्ट झाडाचे मूळ खाऊन स्वतःचा बचाव करतात, हे खरे आहे काय?
साप हे मुंगसाचे भक्ष्य आहे. त्यामुळे आपले भक्ष्य पकडण्यासाठी मुंगूस अतिशय चपळतेने हल्ला करतो. त्यामुळे मुंगूस सहसा मरत नाही. तरीसुद्धा मुंगसाच्या शरीरावर वार केला नसलेल्या ठिकाणी (पाय किंवा तोंड, नाकाच्या शेंडा) नागाने चावा घेतल्यास मुंगूस मरू शकतो.

९) मांडूळ सापाची किंमत (तस्करी) का केली जाते?
जमिनीखाली आढळणारा अत्यंत शांत स्वभावाचा हा साप. शेपटीकडील बाजू ही तोंडासारखी आकाराने असते. त्यामुळे या सापाला ‘दुतोंड्या’ असेही म्हटले जाते. परंतु हल्ली या पंधरा वर्षांत मांत्रिक-तांत्रिक लोकांकडून या सापांना पकडून मंत्रविधी केल्याने पैशांचा पाऊस पडतो. घरात ठेवल्याने धनलाभ होतो, तर बुटक्या माणसांची उंची वाढते. कॅन्सरवर रामबाण इलाज या अशा अफवांमुळे हा साप बदनाम झाला आहे. बर्‍याचदा तस्करी करताना हा साप पकडला आहे.

१०) जुना किंवा देवाचा नाग असल्यास त्याच्या अंगावर केस असतात का?
सरपटणार्‍या प्राण्यांच्या अंगावर केस नसतात, गारुडी किंवा मदारी लोक मेंढीच्या किंवा शेळीच्या शेपटीच्या केसांचा पुजका मोठ्या सुईमध्ये ओवून टाकतात आणि त्याला मिशीसारखा आकार प्राप्त होतो व सापाला तो केसांचा पुंजका शिवतात. गारुडी लोक यालाच देवाचा नाग म्हणून लोकांना फसवतात.

सापांबद्दलच्या अंधश्रद्धा कोणत्या?
सापांबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमज आहेत, त्या पुढीलप्रमाणे :
१) साप दूध पितो.
२) साप पुंगीच्या तालावर डोलतो
३) सापांना सुगंधाची आवड असते. तो केवड्याच्या बनात राहतो.
४) साप ‘डूक’ धरतो, त्याला चिडविणार्‍या किंवा त्रास देणार्‍या व्यक्तीचा बदला घेतो.
५) साप मानवी अवतार घेतात.
६) साप चावला असता उलटा होतो. त्यामुळे विष शरीरात जाते.
७) धामणीच्या शेपटीत काटा असतो. ती गायी-म्हशीच्या नाकात शेपटी घालून त्यांना मारते. धामण गायी-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते
८) जुनाट सापांच्या शरीरावर केस असतात.
९) साप धनसंपत्तीचे रक्षण करतो.
१०) सर्पविष मंत्रोपचाराने उतरवता येते.
११) नागाच्या डोक्यावर नागमणी असतो.
१२) हरणटोळ सर्प माणसाच्या डोक्यावर उडी मारून डोके फोडतो.
१३) अजगर माणसाला गिळतो.
१४) गरोदर स्त्री आणि साप यांची नजरानजर झाल्यास सापाचे डोळे जातात.
१५) गरोदर स्त्रीने सापाला पाहिल्यास जन्मणारे मुलास जीभ चाटण्याची सवय लागते.
१६) वापरलेले सॅनेटरी नॅपकीन जर सापाने खाल्लं तर गर्भ धरत नाही.
१७) साप पकडणार्‍यांकडे मंत्र असतो.
१८) सापांच्या जुळ्यामधला एखादा मारला तर दुसरा साप बदला घेतो. या अशा अनेक अंधश्रद्धा सर्रास आपल्याकडे आहेत.

सर्पदंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी?

१) सर्वप्रथम हे लक्षात घेऊयात की, जिथे उंदीर, पाल, सरडे, बेडूक, घुशी हे असतील, तिथे साप हा हमखास येणारच. म्हणून आपणही दक्षता घेऊयात की, वरील कोणताही जीव आपल्या आसपास नसावा, जेणेकरून सापाचा व आपला मुकाबलाच होणार नाही.

२) बरेच दिवस पडलेले विटांचे ढीग, अडगळ या ठिकाणी हात घालताना पहिल्यांदा काठी जमिनीवर आपटावी, मगच हात घालावा.

३) शेतात रात्री-अपरात्री जाताना काठी आपटत चालावे. कारण सापांना आवाज नाही;  पण जमिनीची कंपने जास्त लवकर जाणवतात व ते रस्ता सोडून दूर जातात. अडगळीच्या ठिकाणी, शेतात किंवा जंगलभ्रमंती करताना नेहमी डोक्यावर टोपी आणि पायात बूट असायला हवेत.

५) शेतातील घरात झोपण्याची वेळ आल्यास, नेहमी खोलीच्या मधोमध झोपावे, जमल्यास कॉटही मधोमध ठेवूनच झोपावे. कारण साप जर घरात आला तरी भिंतीच्या कडेनेच तो फिरत असतो.

६) घराबाहेरील रात्रीचा बल्ब हा नेहमी दरवाजा सोडून बसवावा. कारण जळता बल्ब हा रानातील किडे आकर्षित करतो व किड्यांना खायला पाल किंवा बेडूक व त्यांना खायला साप येण्याची शक्यता अधिक असते म्हणून बल्ब नेहमी कडेला बसवावा.

७) घरातील पाळीव पशु-पक्षी घरात न ठेवता काही अंतरावर सुरक्षित पिंजर्‍यात ठेवावेत. 

सर्पदंशानंतर घ्यावयाची काळजी (प्रथमोपचार)
१) रुग्णास कोणत्याही प्रकारची हालचाल करू देऊ नका.
२)जर नाग किंवा मन्यार चावल्यास दंश झालेल्या ठिकाणी रुमालाने, दोरीने ३/४ रुंदीचे कापड किंवा शक्य झाल्यास ‘क्रेप बॅन्डेज’ने बोट किंवा पेन आत राहील, अशा अंतराने मध्यम दाब देत बांधावे. (घोणस किंवा फुरसे चावल्यास असेल तर बँडेज किंवा कापडी पट्टी अजिबात बांधू नये)
३) दंश झालेला भाग जंतुनाशकाच्या सहाय्याने स्वच्छ करावा.
४) कोणत्याही प्रकारच्या शस्त्राने जखम कापू नये/खराब करू नये.
५) मानसिक संतुलनही स्थिर ठेवावे, जास्त चिंताजनक वातावरण करू नये.
६) रुग्णास काहीही खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये.
विनाविलंब दवाखान्यात घेऊन जावे.

सर्पदंशामुळे मनुष्य मृत्युमुखी पडण्याची प्रमुख कारणे

१) दंशाच्या ठिकाणाहून दवाखान्यापर्यंत पोहचायला विलंब करणे/होणे
२) रुग्णामध्ये भीती निर्माण होणे.
३) चुकीचे प्रथमोपचार – नस/शीर कापून घेणे.
४) रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती (Immunity) कमी असणे.
५) रुग्णाच्या शरीरात विषाची मात्रा जास्त जाणे.

– टिम वर्ल्ड फॉर नेचर

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728